कसे विकावे ? विकू नका विकत घ्यायला लावा.

कसे विकावे ? या आधी कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आधी हा लेख वाचा.

कसे विकावे ?

आपण सर्वच विक्रेते नाही का ?

विकणे म्हणजे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवणे.

लहान मुलांना जेव्हा चॉकलेट किंवा खेळणे पाहिजे असते तेव्हा ते काय करतात ?

कॉलेज मध्ये चांगले प्रॅक्टिकल चे मार्क्स मिळावे म्हणून आपण काय केलं ?

तुम्हाला एखादी मुलगी आवडू लागल्यावर तुम्ही तिच्याशी कसे वागू लागलात ?

पहिली गाडी मिळवण्यासाठी घरी काय कारण सांगितलं ?

नोकरीच्या मुलाखती मध्ये तुम्ही काय करता ?

म्हणजे प्रत्येकजण या जगात काही ना काही विकतच आहे.

कोणी म्हणतो माझ प्रॉडक्ट घ्या, कोणी म्हणतो माझी सुविधा घ्या, तर कोणी म्हणतो मलाच घ्या.

तुमची आई लहानपणी तुम्हाला कसे जेवू घालायची ? कसे तुम्हाला कडू औषध प्यायला लावायची ? कसे सर्व भाज्या खाण्यास सांगायची. तुम्हाला विकता आलं तर तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी करायला लावू शकता.

पण काही लोकांनी विकण्याची इतकी अति केली कि ते खोटं बोलू लागले. त्यामुळे आजकाल विकणे म्हणजे खोटं बोलणे, फसवणे याच्या बरोबरीने हा शब्द येऊ लागला आहे.

जे विकण्यासाठी खोटं बोलतात, ते जीवनात दुरचा विचार करत नाहीत. ज्या व्यक्तीला दीर्घकाळ व्यवसाय करायचा आहे, त्याने विकताना खोटे बोलणे म्हणजे मृत्युचे चुंबन घेणे आहे – Kiss Of Death. खोट बोलून तुम्ही एकदाच त्या व्यक्तीला काही विकू शकता, मग झालं तुमचा व्यवसाय त्या व्यक्तीशी नेहमीसाठी संपला.

हा लेख कसे विकावे ? वाचताना तुम्ही दुसर काहीच लक्षात नाही ठेवलं आणि फक्त एवढाच लक्षात ठेवलं कि खोटं बोलून विकायचा नाही तरी पुरे आहे.

तुम्हाला खोटं बोलाव लागत असेल तर तुम्ही परत जाऊन तुमच्या प्रॉडक्ट वर काम केल पाहिजे किंवा तुमच्या मालाच्या अनुकूल लोकांना ते दिल पाहिजे.

विकू नका विकत घ्यायला लावा.

विकत घेताना ‘निर्णय’ हा ग्राहकाचा असतो. त्यावर ‘ताबा’ हा ग्राहकाचा असतो. पण विकत घ्यायला लावताना ताबा विकणाऱ्याकडे असतो. त्यामुळे विकत घेणाऱ्याला शक्तीहीन वाटतं, कमजोर वाटतं. कोणालाच कमजोर होणे आवडत नाही. त्यामुळे तुम्ही लोकांना जेवढे विकू पाहणार, तेवढे लोक तुमच्या दूर जातील. त्यांना भीती वाटेल. म्हणून विकू नका, विकत घ्यायला लावा.

कसे विकावे ?

सर्वात आधी स्वत:ला प्रश्न विचारावा,” मी जे विकतोय ते खरच पुढच्या व्यक्तीसाठी कामाची गोष्ट आहे का ? त्यासाठी ही गोष्ट योग्य आहे का ?”

आपल्याकडे म्हणतात ना, ‘गंजे को भी कंघी बेचना’. पण मी असल्या विचारांशी सहमत नाही. कारण गरज नसताना त्या माणसाला तुम्ही आज काही विकू शकता पण नेहमीसाठी नाही.

तुम्हाला जर ब्रांड बनवायचा असेल तर तो ग्राहक तुमच्याशी प्रामाणिक असला पाहिजे. तो तुमचा फॅन असला पाहिजे. तो दुसरीकडे कुठे गेला नाही पाहिजे. यासाठी तुम्हाला त्याच्याशी प्रामाणिक असावेच लागेल, तरच तो तुमच्याकडे परत परत येईल.

तुमच्यासोबत कधी हा प्रसंग घडलाय ? तुम्ही एखाद्या दुकानात गेलात तुम्हाला हवं ते सामान तुम्हाला मिळाल नाही. तेव्हा तुम्हाला त्या दुकानदाराने तुम्हाला सल्ला दिला की, अमुक अमुक दुकानात जा तुम्हाला ते सामान मिळून जाईल.

पुढल्या वेळी तुम्हाला त्या प्रामाणिक सल्ला देणाऱ्या दुकानात जायला तुम्हाला आवडेल ? कारण तिथे तुम्हाला प्रामाणिक सल्ला मिळाला आहे ?

याउलट आपण दुसरे उदाहरण पाहू, तुम्ही एखाद्या दुकानात गेलात तुम्हाला हवी ती गोष्ट तिथे नाही. मग दुकानदाराने त्या दुकानात होती ती गोष्ट तुम्हाला सर्वोत्कृष्ट म्हणून विकली.

तुम्ही परत त्या दुकानात जाणार ?

सांगण्याचा मुद्दा हा की, जर तुम्हाला एका व्यक्तीशी एकदाच व्यवहार करायचा असेल तर तुम्ही व्यवहार करण्यावर भर द्या. पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी वारंवार व्यवहार करायचा असेल तर त्याच्याशी संबंध निर्माण करण्यावर भर द्या.

“तुम्हाला जो माल खपवायचा आहे, तो ग्राहकांच्या डोळ्याच्या उंचीच्या पातळीवर ठेवा.”

– James Clear

अनुभव आणि भावना विका

विक्री करणे म्हणजे भावनांचे हस्तांतरण करणे, तथ्ये सादर करणे नाही. जर विक्री फक्त तथ्यांचे सादरीकरण असते तर पीडीएफ, ब्राऊशर किंवा वेबसाइट पुरेशी असती.

The Dip Book

कथा विका, उत्पादन नाही.

Sahil

कार विकताना तुमची कार १ सेकंदमध्ये किती जोरात जाऊ शकते याच लोकांना फार महत्व वाटत नाही. पण कार मध्ये बसल्यावर तुम्हाला कोणती भावना येते ? तुम्हाला काय अनुभव येतो ? हे महत्वाचं आहे. टाटा नॅनो ची जाहिरात आठवते ? खाली पहा.

कसे विकावे ?

कोणत्या कार मध्ये बसल्यावर तुम्हाला खास वाटतं ?

कोणत्या कार मध्ये बसल्यावर तुमच्यात वरचढ असल्याची भावना निर्माण होते ?

कार विकणारे याच गोष्टीवर जास्त भर देतात. आमच्या कार मध्ये बसून तुम्ही कसे खास बनाल, हेच सांगितलं जातं.

होम लोन कंपनी दाखवतात की तुम्हाला स्वतःच घर नसलं, तर काय काय समस्या येतात. त्यांचा भर भावनांवर जास्त असतो, त्यांचं लोन उत्तम का यावर कमी. उदाहरण खाली पहा.

कसे विकावे ?

कोका कोला पेप्सी च्या जाहिराती पहा. त्या जाहिराती मध्ये पिल्यावर तुम्हाला कसे वाटेल ? हा अनुभव विकतात. हास्यास्पद बाब म्हणजे, दारू पिल्यामुळे अनेक गुन्हे घडतात, पण जाहिराती मध्ये दारू पिऊन चांगली कामे केली जातात, हे दाखवल्या जाते.

Deo लावून तुमचा वेगळा सुगंध येईल, हे विकताना कंपनी तुम्हाला अनुभव विकतात. Deo लावल्यावर काय होईल ? कशा मुली तुमच्यावर तुटून पडतील.

Fair & Lovely लावल्यावर काय होईल ? तुम्हाला ऑफिस मध्ये प्रोमोशन न मिळण्याचं कारण तुमचा रंग आहे, हे तुम्हाला सांगतात. सर्व जाहिराती हेच सांगतात कि त्यांचे उत्पाद वापरल्यावर तुम्ही कसे वेगळे दिसाल, तुमच्या जीवनात काय बदल होईल. ते त्यांच्या उत्पादमध्ये काय खास आहे ? हे सांगण्यावर जास्त भर देत नाही. तर ते उत्पाद वापरल्यावर तुमचे जीवन कसे बदलेल यावर भर देतात. कसे तुमची वाहवाही होईल. कसे तुम्ही मोठे व्हाल. जाहिराती भावना विकतात, उत्पाद नाही.

सामान्य माणसाला दोन तांत्रिक गोष्टींमध्ये फरक करणे कठीण जाते, पण भावनांमध्ये फरक करणे सोपे जाते. जसे पतंजली वापरून तुम्ही देशसेवा करत आहात, ही भावना सहजच तयार केली जाऊ शकते. पतंजली चे उत्पादन तांत्रिक दृष्ट्या कसे चांगले आहे, हे समजावून सांगण्यास त्यापेक्षा कठीण आहे.

कार मध्ये कोणते इंजिन आहे, गाडीची जमिनीपासून ची उंची किती ? गाडीच्या चाकाचा व्यास किती ? ह्या सर्व गोष्टी समजवण्यास फार कठीण आहेत. पण कोणत्या कार मध्ये आपण बसून गेलो तर सर्व लोक आपल्याकडे पाहतील हे सांगणे सोपे आहे.

तुमच्या उत्पादनाची इच्छा निर्माण करा. यामुळे लोक खरेदी करतील.

Zero To One

तुमचा आदर्श ग्राहक कोण ?

याबद्दल तुम्ही आधी सुनिश्चित व्हा, म्हणजे तुम्हाला माहित असेल तुम्हाला कुठे प्रयत्न करायचा आहे.

तुमचा आदर्श ग्राहक कोण ? काय खातो ? पितो ? वाचतो ? त्याला काय आवडत ? त्याला काय हव आहे ? या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. नेहमी तुमच्या आदर्श ग्राहकाकडे पहा. तिथून तुम्हाला कळेल तुम्ही काय केल पाहिजे ?

सर्वच लोक माझे ग्राहक आहेत, हे बोलणे मूर्खपणा आहे. सर्व लोकांच्या गरजा सारख्या नसतात. निदान व्यवसायाच्या सुरवातीला तरी तुमच लक्ष्य केंद्रित असल पाहिजे. व्यवसायाच्या सुरवातील तुमच्याकडे ठराविक संसाधन असतात त्यामुळे तुम्ही लक्ष्य केंद्रित ठेवलं पाहिजे. एक ना धड भाराभर चिंध्या नको व्हायला.

वॉलमार्ट चे उदाहरण पाहू. वॉलमार्ट जेव्हा सुरु झाले होते. तेव्हा त्यांनी मोठ्या शहरात असलेले, मोठ्या व्यवसायांशी स्पर्धा केली नाही. याउलट छोटे शहर, जिथे छोटे व्यवसाय आहेत, ज्यांना वॉलमार्ट हरवू शकत, तिथे स्पर्धा केली. अशा इतर व्यवसायांना हरवत वॉलमार्ट मोठे झाले व शेवटी मोठ्या शहरातील मोठया मॉल्स ला टक्कर देऊ लागले. म्हणून आपला ग्राहक कोण हे आपल्याला माहीत पाहिजे.

व्यवसायाच्या सुरवातीला आपल्याकडे संसाधने फारच अत्यल्प असतात. म्हणून सुरवातीला तुमचा आदर्श ग्राहक कोण ? हे जाणून घ्या.

याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, यशस्वी कसे व्हावे ? श्रीमंत कसे बनावे ? यशाचं रहस्य अशा गोष्टींचे पुस्तक तुम्ही यशस्वी, श्रीमंत लोकांना जास्त विकू शकता, गरीब आणि अयशस्वी लोकांपेक्षा. कारण श्रीमंत, यशस्वी लोकांना अशा पुस्तकांचं महत्त्व माहीत असत.

तुम्ही या तुमच्या आदर्श ग्राहकांपर्यंत कसे पोहचू शकाल ?

“तुमच्या दुकानाची जाहिरात करु नका! फक्त एक उत्तम ऑफर द्या.”

विश्वास

लोकांना तुमच म्हणणं पटत आहे, तुमचा उत्पाद वापरून त्यांना फायदा होईल. किंमत पण त्या उत्पादनाची योग्य आहे. तरी पण लोक तुम्हाला नकार का देतात ?

जर तुमच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास नसेल तर त्यांना तुमचे उत्पाद विकत घ्यावेसे वाटूनही ते घेणार नाहीत. कारण त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही.

लोकांनी तुमच्याकडून काही विकत नाही घेतलं तरी हरकत नाही. तुम्ही त्यांच्याशी संबंध बनवण्यावर भर द्या. या संबंधामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईलच.

पण हा संबंध बनवताना खोटेपणा आणू नका. एक चांगला सल्लागार बनण्याचा प्रयत्न करा. संबंध आपोआप निर्माण होईल.

बेईमान विक्री.

चष्म्यावाल्याची कथा

एक चष्म्याचा दुकानदार आपल्या मुलाला कसे विकायचे हे शिकवत होता. तो म्हणाला, ‘जर कोणी आपल्या दुकानात आले तर त्यांना आधी बसू दे आणि मग त्यांना नवीन चष्मा वापरून पाहण्यास सांग. पुढे कुशलतेने त्यांचे कौतुक कर आणि ग्राहकांना नवीन चष्म्यासह ते किती स्मार्ट आणि आकर्षक दिसतात ते पटवून सांग. जर त्यांना खात्री वाटली तर, खूप हळू आणि विनम्रपणे सांग, $ 10. जर ते आताही खूप प्रसन्न वाटत असतील तर बोल “लेंसशिवाय” . जर त्यांनी लेंसची किंमत विचारली तर $ 10 सांग. जर ते अद्यापही खूप आनंदी दिसत असतील तर “प्रत्येकी” हा शब्द जोड.’

तुम्हाला विकायला आवडत का ?

विकणे हि एक कला आहे. ती सर्वांनाच येते असे नाही. आधी स्वत:ला विचारा, मी कलात्मकरित्या माझा मालाला किंवा स्वत:ला लोकांना विकू शकेल का ? तुम्हाला नवीन लोकांना भेटणे बोलणे आवडते का ? जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही कोणाला हे करण्यासाठी नेमू शकता. विकणे हे तुम्ही शिकू शकत नाही अशातला भाग नाही. पण त्या साठी लागणारी मेहनत घ्यायला तुम्ही तयार आहे का ?

ऐका

विकताना फक्त बोलू नका, ऐका. तुमच्या ग्राहकांच्या अपेक्षा काय ? हे विचारा. त्यांच्या अपेक्षांशी, तुमचा कोणता माल / सुविधा जुळते ते पहा.

त्यांच्या अपेक्षा कळल्या कि तुम्हाला त्यानुसार त्यांना माल / सुविधा देता येईल. तुमचा व त्यांचाही वेळ वाचेल. तसेच अनावश्यक अनेक प्रकारचे माल / सुविधा तुम्ही सुचवल्यामुळे त्यांचा गोंधळ होणार नाही. त्यांचे ऐकण्यासाठी त्यांच्या आवडीमध्ये सहभाग घ्या, त्या जाणून घ्या. त्यांच्यामध्ये तुमच्या सोबत वेळ घालवण्याची इच्छा निर्माण करा.

नकार आणि सुधार

प्रत्येक नकार तुम्हाला होकाराकडे घेऊन जाईल, जर तुम्ही स्वतःमध्ये सुधार घडवत राहिलात तर.

नकार हा विकण्याचा भाग आहे. सर्वच लोक तुमचा उत्पाद / सुविधा घेणार नाहीत. तुम्हाला फक्त त्या लोकांपर्यंत पोहचायचे आहे, ज्यांना तुमचा उत्पाद /सुविधा हवी आहे. त्यासाठी तुम्हाला अनेक नकारांना सामोरे जावे लागेल. पण जर तुम्ही मिळणाऱ्या नकारापासून शिकत नाही गेले तर मग तुमच्या नकाराच प्रमाण कमी होणार नाही.

जो नकार देत आहे, तो का देत आहे ? त्यांचा नकार , होकारात बदलण्यासाठी काय सुधार करावा लागेल ? हा विचार करा.

पहिल्यांदा तुम्हाला यश आले नाही, तर परत प्रयत्न करा. पण तीच ती गोष्ट परत करू नका. कारण तुम्हाला माहीत आहे ती गोष्ट काम करत नाही

– CLAUDE

२० % ग्राहक तुम्हाला ८०% व्यवसाय देतात. म्हणून तुमचे प्रयत्न तुम्ही योग्य २० % ग्राहकांवर करताय यावर लक्ष्य द्या. या सिद्धांतावर आधारित ह्या पुस्तक बद्दल अधिक माहिती तुम्ही या लेखात पाहू शकता.

ग्राहकांना बनवा ब्रांड चा दूत

तुमच्या ग्राहकांना खुश ठेवा. ते तुमचे चांगले ब्रांड दूत बनतील. त्यांचे मित्र नातेवाईक यांची माहिती त्यांच्याकडून घ्या, त्यांना पण तुमचा माल / सुविधा द्या.

तुमचे ग्राहक कोण ?

१. सध्याचे तुमचे ग्राहक

२. संदर्भातून मिळणारे

३. तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्या कंपनीचे ग्राहक

४. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचे घ्राहक

५. असे ग्राहक ज्यांना त्वरित गरज आहे.

६. ग्राहक जे तुमच्या जाहिरातीने येतात.

७. उरलेले लोक

प्रत्येक व्यक्तीला भेटण्यात वेळ वाया घालू नका. तुमचा आदर्श ग्राहक शोधा आणि त्यांच्यावर लक्ष्य द्या.

सहसा तुम्हाला असे रिकामे लोक मिळतील ज्यांच्याकडे काही काम नाही. म्हणून ते तुमचे बोलणे ऐकत आहेत. पण अशा लोकांकडे पैसे नसतील तर तुमचा उत्पाद आवडून पण ते कसे विकत घेणार ?

कोणीही तुमची माहिती ऐकायला तयार आहे, म्हणून त्याला माहिती देऊ नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. जे ग्राहक विकत घेणार आहेत त्यांच्यावर लक्ष्य द्या. त्यातही त्या २०% ग्राहकांवर लक्ष्य द्या, ज्यांच्यापासून तुमचा ८०% व्यवसाय येतोय.

लोकांच मन ओळखा.

ग्राहकांशी बोलताना तुम्हाला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतील आणि असे प्रश्न विचावे लागतील ज्याने तुम्हाला ग्राहकांबाद्द्ल माहिती मिळेल. त्याने तुमचे समज मजबूत होतील किंवा तुटतील.

सोशल मीडिया

आजचे ग्राहक आणि भविष्याचे ग्राहक तुम्हाला इथेच मिळतील. तुमचे ग्राहक त्यांचा फुरसतीचा वेळ इथे घालवतात. इथे तुम्ही स्वस्तामध्ये त्यांच्या पर्यंत पोहचू शकता. इथे तुम्हाला ग्राहकांबद्दल भरपूर माहिती मिळेल. जसे त्यांचे वय, लिंग, आवडी, निवडी ठिकाण. या माहितीचा पुरेपूर फायदा घेऊन तुमच्या व्यवसायात सुधारणा करू शकता.

सोशल मीडिया वर तुम्ही कुठल्या शहाराकरिता जाहिरात करायची आहे हे ठरवू शकता. कोणत्या वयाच्या, लिंगाच्या आवडी निवडीनुसार जाहिरात करू शकता. कुठली जाहिरात किती यशस्वी झाली आहे, हे तपासू शकता. यावरून ठरवू शकता कुठली जाहिरात पुढे चालवायची आहे, कुठली बंद करायची आहे. आपण जे मोजू शकतो, ते सुधारू शकतो.

प्रत्येक ग्राहक सारखा नसतो.

कोणत्या ग्राहकाकडे वेळ नसतो, काही ग्राहक वेळ घालवायलाच येतात.

काहींना स्वस्तात स्वस्त हवं असते, काहींना चांगल्यात चांगलं. प्रत्येक ग्राहक वेगळा असतो.

तुम्हाला समोरचा व्यक्ती कोण आहे ? त्याला काय हवं आहे ? हे गृहीत तर धरावच लागत, पण आपल्या समजुती सत्य मानून चालू नका. त्या व्यक्तीला प्रश्न विचारा. तुमचे समज घट्ट होतील किंवा बदलतील. पण आपल्या समजुती बदलण्याची तयारी ठेवा.

योग्य प्रश्न विचारा. असे प्रश्न विचारा, ज्याने तुम्हाला माहित पडेल कि तुमच्याकडे असलेला कोणता उत्पाद या व्यक्तीच्या कामी पडेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि उत्पाद पाहून ग्राहकाला संभ्रम होणार नाही.

योग्य प्रश्न तुम्हाला योग्य उत्तराकडे घेऊन जाईल.

नकार वर पण मारू शकतो षटकार

पहिला नाही आला म्हणजे, तो शेवटच नाही नसतो. आपण सर्व मनुष्यांना जे चालू आहे ते चालू ठेवाव वाटतं. कारण त्यात आपण सुक्षित असतो, अस आपल्याला वाटतं.

आपण सर्वांनी एका बेडकाची गोष्ट ऐकली असेलच. बेडकाला पाण्यात ठेवलं. पाणी हळूहळू गरम केल. पुढे ते पाणी इतकं गरम झाल कि ते बेडूक जाळून मेलं, पण उडी मारून बाहेर पडलं नाही.

आता दुसर बेडूक जेव्हा सुरवातीलाच गरम पाण्यात टाकल तेव्हा ते उडी मारून पळून गेलं.

आता हि गोष्ट खरी का खोटी हे माहित नाही. पण या गोष्टीचा भावार्थ हाच कि बदल आपल्याला आवडत नाहीत. मग ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, आपण तिथेच राहतो. दिवसेंदिवस ती परिस्थिती हळूहळू खराब होत असेल तरीही, आपण तिथेच राहतो. आपला नाश होत नाही त्या दिवस पर्यंत. कारण होणारं नुकसान हे एका फटक्यात होत नाही, हळू हळू होत.

म्हणूनच लोक FD मध्ये कमी परतावा घेऊन खुश राहतात, कारण त्यात पाणी हळू हळू गरम होत राहतं. त्यांना काळात नाही कि आपली संपत्ती महागाईच्या दराने वाढत आहे. मग जेव्हा निवृत्तीची वेळ तेथे, तेव्हा फार उशीर झालेला असतो.

मग वरच्या गोष्टीचा विकण्याशी संबंद काय ?

सांगण्याच तात्पर्य हे कि प्रत्येक व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया हि वस्तुस्थिती न बदलू देण्याची असते. म्हणजे तुमचा बूट चांगला असला तरी त्या व्यक्तीला वाटेल, जुन्यामुळे माझं काम तर ठीक चालू आहे ना ? मग कशाला बदलू आणि तो नाही बोलतो.

पहिला नाही हा नेहमीच सुरक्षा सोडून नवीन जागी जाण्यासाठी चा असतो. त्या नाही चा अर्थ हा नसतो कि मला हे उत्पाद नको, त्या नाही चा अर्थ असतो, मला माझी सुरक्षा सोडून नवीन जागी जायचे नाही.

तुम्ही विक्रेते आहात. तुमचे काम आहे, त्या व्यक्तीला हे पटवून देणे कि त्याने हि जुनी वस्तू त्यागून नवीन वस्तू घेणे का आवश्यक आहे ? आणि ती नवीन वस्तू जुन्यापेक्षा चांगली का आहे.

त्या व्यक्तीने जुना बूट का सोडून द्यावा ? आणि तुमचा नवीन बूट का घ्यावा ? हे सोप्या भाषेत त्या व्यक्तीला पटवणे, म्हणजे विकणे.

पृथ्वी सोडा

तुम्ही कोणाला पृथ्वी सोडावी लागेल हे विकू शकता का ?

Elon Musk Spacex कंपनीचे CEO यांनी लोकांना पृथ्वी सोडण्याची तयारी करण्याच सांगितलं आहे. या अंतराळात पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे आणि सूर्य काही एका जागी स्थिर नाही तो हि अंतराळात फिरत आहे.

या अंतराळात फक्त आपण एकटे नाही. इथे असंख्य इतर ग्रह , सूर्य फिरत आहेत. एक वेळ अशी येणार आहे, जेव्हा आपली कुठे न कुठे कोणाशी तरी टक्कर होईलच. त्यासाठी मानवांनी आधीच तयारी करून ठेवली पाहिजे. आपली राहण्याची दुसरी सोय करून ठेवली पाहिजे.

Elon Musk च्या मते आपण ड्राइवर नसलेल्या कार मध्ये बसलेलो आहोत, ज्याचा कधी न कधी अपघात होईलच.

मग जर एक व्यक्ती तुम्हाला पृथ्वी का सोडावी हे पटवू शकतो, तर तुम्ही जुना बूट सोडून नवीन का घ्यावा ? हे पण पटवू शकता. सर्वांनाच आपण पटवू शकतो, असे मला म्हणायचे नाही . सर्वाना आपल्याला पटवायचे पण नाही आहे.

अनेक ढोंगी बाबा लोक लोकांना मूर्ख बनवतात. याउलट आपण तर त्यांच्या फायद्याचा उत्पाद देतोय मग आपल्यात कमी काय ? विकण्याची कला.

बाबा लोकांना विकता येतं. नोकरी, व्यवसाय वा प्रेमात अपयशासाठी ते लोकांना हिरवी नाही लाल चटणी खा, हे पटवू शकतात. तर मग आपण लोकांना त्यांच्या फायद्याचा उत्पाद विकत घेण्यासाठी पटवू शकणार नाही का ?

माझे असे म्हणणे बिलकुल नाही कि आपण सर्वच व्यक्तींना विकू शकतो. माझे फक्त एवढे म्हणणे आहे, ढोंगी लोकांना ग्राहक सापडतात, मग आपल्याला का नाही ? ह्या बाबा लोकांनी पण १०-१५ वर्ष लावलीत, तेव्हा त्यांच्याकडे इतके भक्त जमा झालेत. तशी चिकाटी दाखवायला तुम्ही तयार आहात का ?

न्यूनगंड

ह्या ढोंगी बाबा लोकांनी विचित्र कपडे घालून लोकांसमोर विश्वासाने जाण्याची हिम्मत दाखवली.

मनातील लाज सोडून विकण्याची हिम्मत आपण दाखवू शकतो का ? आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करणार टी-शर्ट घालू शकतो का ? रस्त्याच्या कडेला छोटी दुकान टाकून नातेवाईक काय विचार करतील ? हा मनातील न्यूनगंड काढू शकतो का ?

छोटी सुरवात करण्यात न्यूनगंड सर्वात मोठा अडथळा आहे. आपण विचार करतो लोक आपल्यावर हसतील, हा काय एवढसं छोटं काम करतोय ? हा भिकारी झाला का ? असे लोक बोलण्याचा आपण विचार करतो. त्यामुळे आपण छोटे व्यवसाय सुरू करण्याचा विचारच करत नाही. याउलट व्यवसाय चालेल का नाही ? हे माहित नसताना मोठी गुंतवणूक करून व्यवसाय सुरु करतो. कारण ? आपण छोटा व्यवसाय केला तर लोक आपल्यावर हसतील हा न्यूनगंड मनात असतो. रस्त्याच्या कडेला बसून, घरोघरी जाऊन, तुम्ही तुमचा व्यवसाय माल विकू शकता का ? कि तुम्हाला लाज वाटेल ?

एकदा नाही अनेकदा

कोणालाही वस्तू फक्त एकदा विकण्याकडे लक्ष्य देऊ नका. एकाच व्यक्तीला परत परत विकण्याचा प्रयत्न करा.

याचा अर्थ त्यांना खराब माल विका असा मुळीच नाही. त्यांना चांगल्या गुणवत्तेचाच माल द्या. पण तो ग्राहक पुढल्या वेळेस तुमच्याकडे येईल, याकडे लक्ष्य द्या.

प्रत्येक मोठया कंपनीचे ग्राहक नसतात तर फॅन असतात. Apple चा मोबाईल वापरणारा परत Apple कडेच जातो. गूगल मध्ये सर्च करणारा गूगल मधेच सर्च करतो. तुम्ही जीवनात आता पर्यंत किती वेळा टूथपेस्ट बदलली आहे ? ग्राहक न बनवता तुमचे फॅन बनवा. तुमचा व्यवसाय महान बनेल.

इतर लेख तुम्ही इथे वाचू शकता.

हा लेख लिहिताना मला खालील पुस्तकांची मदत झाली. आपणही हि पुस्तके वाचू शकता.

आमचे फेसबुक पेज ला इथे भेट देऊ शकता.

Local Online Marketing. ऑनलाईन जाहिरात कशी करावी ?

लहान व्यवसाय जाहिरात मॅन्युअल

4 thoughts on “कसे विकावे ? विकू नका विकत घ्यायला लावा.”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.