कोणता व्यवसाय सुरु करावा ? व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ? अनेकजण ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात. प्रश्न लहान आहे, पण उत्तर नाही. ह्या प्रश्नाच उत्तर तुमच जीवन बदलू शकतं आणि हे जगही.

बदल

मागील १० वर्षात कोणते व्यवसाय जन्माला आले ? आणि कोणते नाहीसे झाले ?

कॉइन बॉक्स आठवतात का ? काही वर्षापुर्वी जागोजागी दिसणारे कॉइन बॉक्स आता कुठे आहेत ? सर्वांच्या घरी दिसणारे Kodak कॅमेरा कुठे आहेत ? Cassettes, Radio कुठे आहेत ? जर तुम्हाला कोणी १० वर्षा आधी सल्ला दिला असता, ह्या व्यवसायांपैकी एक व्यवसाय करा तर काय झाले असते ?

१० वर्षात काही नवीन व्यवसायही जन्माला आलेत म्हणा. ऑनलाइन विक्री, मोबाईल रिचार्ज – रिपेअर सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची, पण आज हजारो टीव्ही चॅनेल्स कमी पडून लोकांना Youtube पाहिजे आहे. आणि आता त्याहीपुढे लोकांना नेटफ्लिक्स हवंय.

कोणता व्यवसाय सुरू करावा ?

मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा ?

तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल कि जग बदलत आहे, आणि ते आता फार वेगाने बदलत आहे. तुम्ही कल्पना केली कि माझा फोन पाण्यात पण चालावा आणि काही वर्षात तसे फोनही आले. तुम्ही कल्पना केली की घर बसल्या मला खरेदी करता यावी आणि आता तुम्ही तसे करतही आहात. घरबसल्या आपल्या नातेवाईकांना आपण पैसे पाठवू शकतो. आता तर नवीन 3d प्रिंटर येत आहेत. आपण घरी बसल्या अनेक वस्तू आता प्रिंट करू शकतो.

हे सर्व सांगण्याचा उद्देश काय ? तर मी कोणता व्यवसाय करावा ? हा प्रश्न आजच्या जगात योग्य प्रश्न नाही. कारण कोणता व्यवसाय किती दिवस टिकेल हे आजच्या जगात सांगता येत नाही.

बरोबर प्रश्न कोणता ?

“प्रत्येकजण मरतो. पण प्रत्येकजण जगत नाही.”

Rebecca Henderson

मी या जगाला काय देऊ शकतो ? मी हे जग आणखी चांगले कसे करू शकतो ? माझ्यात असे कोणते गुण / कला आहेत ? ज्यांच्या मदतीने मी हे करू शकतो ?

ह्या जगात चांगले काम करायला आपल्याला फक्त समाजकार्य करावे लागेल असे नाही.

Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com ही वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे छोटे व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य व्यक्तीलाही झाला.

Steve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली. Apple मुळेच फोनच्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली. आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय.

Bill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली. त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले.

या सर्व लोकांनी आपले जग बदलले नाही का ? त्यांनी स्वत:ला विचारले “मी कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकतो ? मला कोणती गोष्ट मनापासून करायला आवडते ?”

ह्या लोकांनी मोठे स्वप्नं पाहिले. हे स्वप्नं त्यांनी स्वतःसाठी नाही पाहिले की मी मोठी कार घेईल, बंगला बांधेल. तर या लोकांनी जग बदलण्याचे स्वप्नं पाहिले. आपण या जगाला काय देऊन जाणार ? आपण काय बदल घडवून जाणार ? हा विचार त्यांनी सतत केला. त्यामुळेच ते एवढा मोठा धोका पत्करू शकले. त्यामुळेच कठीण प्रसंगी त्यांनी माघार घेतली नाही. कारण त्यांचे स्वप्नं फार मोठे होते.

सर्वांचाच उद्देश जग बदलणे नसेल

सर्वांचाच उद्देश जगाला काहीतरी देऊन जाण्याचा नसेल. सर्वांनाच व्यवसाय करताना एवढे मोठे बनायचे नसेल. मग त्यांनी काय विचार करावा ? जर जग बदलण्या एवढे मोठे स्वप्नं नसेल तर देश कसा बदलेल ? ते पण नाही तर माझे राज्य कसे बदलेल ? माझं शहर ? माझ्या घराच्या आसपासचा परिसर कसा बदलेल ? नाहीतर सर्वात शेवटी माझा स्वतःचा विकास कसा होईल ? हा विचार करायला हवा.

सांगण्याचा मुद्दा हा की, व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो ? असा उद्देश असावा. फक्त श्रीमंत होणे हा तुमचा उद्देश असेल तर तुम्ही एक स्वार्थी, नफ्याच्या मागे पळणारा व्यवसाय कराल. ज्यात पैसे कमावणेच सारे काही असेल. असे व्यवसाय दूरचा विचार करत नाही आणि स्वार्थीपणे नफा कसा वाढेल हा विचार करतात. असे व्यवसाय जास्त काळ टिकत नाहीत.

तुमचा व्यवसाय किती मोठा होईल, हे तुम्ही किती मोठा बदल घडवता यावर अवलंबून तर आहेच. पण उद्देश नेहमी देण्याचा असला पाहिजे, फक्त श्रीमंत होण्याचा नाही.

कधी Steve Jobs, Elon Musk, Bill Gates, Jack Ma यांनी लोकांना जाऊन विचारलं का ? मी कोणता व्यवसाय सुरु करू ? याउलट ह्या लोकांनी आपल्या व्यवसायासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. अनेकांनी त्यांना मुर्खात काढले तरी जगाविरुद्ध जाऊन हे लोक लढले. आपल्या व्यवसायासाला त्यांनी आपले जीवन अर्पण केले.

व्यवसाय कि नोकरी ?

मी कोणता व्यवसाय सुरु करू, हा मुख्य प्रश्न नाही. मुख्य प्रश्न आहे मी व्यवसाय करू की नाही ? आधी तुम्ही हे ठरवा कि तुम्हाला व्यवसाय करायचा कि नोकरी ? कोणता व्यवसाय करावा ही नंतरची गोष्ट आहे. मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ? हा आमचा लेख तुम्ही वाचू शकता.

नोकरी आणि व्यवसाय मध्ये मूळ फरक आहे की व्यवसायात तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला सर्व गोष्टींची जवाबदारी स्वीकारावी लागते. इथे तुम्ही तुमच्या साहेबाला दोष देऊन सुटू शकणार नाही. इथे तुम्हीच तुमचे बॉस आहात. कोणीतरी म्हटलेच आहे ना, “जर तुम्हाला वाटत तुमचे शिक्षक वाईट वाटत असतील तर बॉस मिळण्याची वाट पहा, आणि जर तुम्हाला वाटत तुमचा बॉस वाईट वाटत असेल तर तुम्हीच तुमचा बॉस होण्याची वाट पहा.

व्यवसायात नोकरी पेक्षा जास्त धोका पत्करावा लागतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला विचारता मी कोणता व्यवसाय करू ? तर तुम्हाला काय उत्तर अपेक्षित असतं ? की कोणी असा व्यवसाय सांगावा जो मस्त चालेल, असा व्यवसाय सांगावा जो करणे सोपे असेल, असा व्यवसाय सांगावा ज्यात कमी गुंतवणूक असेल. एक तयार फॉर्म्युला द्यावा की मी कोणता व्यवसाय करू ? हा प्रश्नच मुळात सुरक्षात्मक आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करावा हे उत्तर कोणीच तुम्हाला देऊ शकत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं स्वतःच असलं पाहिजे. तरच तो व्यवसाय यशस्वी होईल, कोणी दुसरा बोलतोय म्हणून केलेला व्यवसाय यशस्वी होईल का ?

तुम्हाला उत्तरात असा व्यवसाय अपेक्षित आहे ज्यात धोका कमी आहे. तुम्हाला जर सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी कडे जावे. तुम्हाला जर जास्त धोका घ्यायचा आहे तर व्यवसायाकडे यावे. व्यवसाय की नोकरी ? काय उत्तर आहे तुमच्या प्रश्नाच ?

व्यवसायाची सुरवात उधारीच्या ज्ञानावर करू नका

जेव्हा तुम्ही विचारता कोणता व्यवसाय सुरु करू ? तेव्हा तुमच्या व्यवसायाची सुरवात उधारीच्या ज्ञानावर सुरु होते. उद्या ज्याने तुम्हाला सल्ला दिला तो नसेल मग ? जेव्हा व्यवसायात वाईट वेळ येईल तेव्हा तुम्ही काय करणार ? जग कसे पटापट बदलत आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय पण आता पटापट बदलेल. तुम्ही कदाचित तोच व्यवसाय कराल पण त्याच स्वरूप बदलेल. तुम्ही आताही कदाचित किराणा मालच विकाल, पण online, home delivery, cash back हे शब्द तुमच्या व्यवसायात जोडले जातील. तुम्ही कदाचित कपडेच विकाल पण होऊ शकते भविष्यात तुमचे कपडे एवढे स्मार्ट होतील की ते तुमच्याशी संवाद साधतील. तुमच्या mood नुसार तुमचे कपडे रंग बदलतील. तुम्हाला कदाचित कधीच दुसरा ड्रेस विकत घ्यावा लागणार नाही, तुमचा ड्रेस तुम्हाला हवे तसं रूप घेईल.

महत्वाचा सांगायचा मुद्दा इथे हा की, आपण जो व्यवसाय करणार आहोत, त्यात यश मिळेल कि नाही ? तो टिकेल का नाही ? किंवा त्याच प्रारूप किती बदलून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवसाय करायचाच, हे तुमच नक्की झाले तर हा ना तो व्यवसाय तुम्ही करालच. महत्वाचं आहे तुमची मानसिकता व्यवसाय करण्याची होणं, ती झाली की, तुम्ही स्वतःसाठी योग्य व्यवसाय शोधून काढणारचं वा निर्माण करणारचं.

आता आपला प्रश्न कोणता व्यवसाय सुरु करावा ? जसे मी वर बोललो कि मी या जगाला काय देऊ शकतो. मी हे जग कसे अजून चांगले करू शकतो ? हा विचार करणे. असे का ? कारण ह्या प्रश्नांचं उत्तर शोधताना तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी मिळतील.

१. माझी आवड काय ?

२. माझ्याकडे कोणते गुण आहेत ?

आपण दुसरा प्रश्न आधी पाहू.

माझ्याकडे कोणते गुण आहेत ?

जी गोष्ट आपल्याला येत नाही, ती आपण सराव करून शिकू शकतो हे मी मानतोच. पण तुम्ही स्वत:ला ओळखणे फार आवश्यक आहे. तुमच्यात काय गुण आहे ? तुम्ही कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकता ? हा पण विचार करा. आपल्याला काय आवडतं हा प्रश्न बहुतेक वेळा बरोबर उत्तर देत नाही. कारण आपली आवड ही आजूबाजूच्या गोष्टींमुळे प्रभावित होते. अनेक लोकांना सचिन तेंडूलकर बनायचे होते आता काहींना विराट कोहली. हळूहळू कबड्डी प्रसिद्ध होत आहे, काहींना त्यात कारकीर्द करावी वाटेल. फिल्मचा हिरो बनण्याची इच्छा तर आपण सर्वांना कधी ना कधी झालीच असेल.

माझी आवड काय ?

आवड अशी नको जमलं तर करून पाहू, ६ महिने – १ वर्ष टिकणारी. आयुष्याची बांधिलकी असणारी आवड हवी. असं काम हवं ज्यात अपयश येत राहिले तरी ते करण्याची इच्छा तुमच्यात असेल.

तुम्हाला काय आवडतं ? आणि तुम्ही कोणतं काम चांगल्या प्रकारे करू शकता, या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य जर तुम्ही गाठला तर फार चांगले होईल. म्हणजे अशी गोष्ट शोधणे जी मला आवडते आणि जी करण्यासाठी लागणारे थोडेफार गुण माझ्यात आहेत. मला फिल्म्स पाहायला फार आवडतात, म्हणून मी actor वा director व्हायचा निर्णय घेतला नाही. कारण ते बनण्यासाठी लागणारे गुण माझ्यात नाहीत असे मला वाटले. म्हणून अशी गोष्ट निवडणे जी तुम्हाला आवडते आणि तुमच्यात ती करण्याचे गुणही आहेत.

“व्यवसाय म्हणजे लोकांची समस्या सोडविणे.”

तुम्हाला व्यवसायात यश कधी मिळेल ?

तुम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगल काही केव्हा करू शकता ? त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ?

जेव्हा तुमच्याकडे प्रतिस्पर्ध्यापेक्षा काहीतरी चांगले असेल. तुम्हाला त्या गोष्टीचा तज्ञ बनावं लागेल. गोष्ट मनापासून आवडली नाही तर तुम्ही त्या गोष्टीचे तज्ञ होवू शकाल का ? तज्ञ झाल्याशिवाय तुम्ही ती गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकाल का ? आणि तुम्ही ती इतरांपेक्षा चांगली करू शकत नाही, मग लोक तुमच्याकडे का येतील ?

जर तुम्हाला गाण म्हणायला आवडत आणि तुम्ही इलेक्ट्रोनिक्स चा व्यवसाय सुरु केला, कारण तुम्हाला कोणी हा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. आता तुम्हाला lcd आणि led मधला फरकच कळत नाही, मग तुम्ही तो व्यवसाय कसा करणार ? पण दोन संगीतातील रागांमधील फरक तुम्हाला अचूक ओळखता येतो. तर तुम्ही कोणता व्यवसाय केला पाहिजे ?

स्टार्ट अप सुरू करण्याबद्दल खूप चांगले पुस्तक Zero To One ह्यावर आमचा लेख तुम्ही वाचू शकता.

व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?

नेता

व्यवसाय मालकाला चांगला नेता होणे फार आवश्यक आहे. त्याच्या हाताखाली नेहमी लोक काम करतात. त्या लोकांकडून त्याला काम करवून घेता आले पाहिजे. त्याला लोकांना प्रशिक्षित करता आले पाहिजे. नाहीतर तो आपल्या व्यवसायात अडकून जाईल आणि तिथला कर्मचारी बनून जाईल.

तुम्ही अनेक कपड्याचा दुकानात हे दृश्य पहिले असेल कि. मालक गुजराती, मारवाडी लोक आहेत. जे फक्त काउंटरवर पैसे घ्यायचं काम करतात. आपल्याला कपडे दाखवणे. बिल तयार करणे हि सर्व कामे मराठी माणसे करतात. अनेक दुकानात तुम्हाला दिसून येईल कि manager हा मराठीच आहे आणि मालक हजर नसताना पण तेच दुकान चांगल्या प्रकारे चालत आहे.

जो माणूस manager बनू शकतो तो मालक का नाही ? त्या दुकानाच्या मालकाने एका इमानदार आणि कर्तुत्वशील माणसाला नोकरीवर ठेवण्यात यश मिळवले आहे. आता तो आपल्या दुसऱ्या व्यवसायाकडे लक्ष्य द्यायला तयार झाला आहे. कोणत्या समाजा बद्दल असंतोष पसरवणे हा उद्देश नाही, तर फरक लक्ष्यात घेऊन स्वतः मध्ये सुधारणा घडवणे आहे.

अनेक लोक स्वतःच्या व्यवसायात नोकरी करू लागतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढीवर ते स्वत:च बंधन लावतात.

विकता येणे

विकता येण का आवश्यक आहे ? आपण सर्वजण काय करतोय ? नोकरीच्या मुलाखतीला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काय करता ? लग्नासाठी स्थळ पाहायला जाता तेव्हा तुम्ही काय करता ? नातेवाईकांना, मित्रांना तुमच्या नवीन विकत घेतलेल्या गोष्टी दाखवताना काय करता ? बॉस ला गुड मॉर्निंग बोलून काय करता ? तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला दिसली कि तुम्ही काय करता ? आपण स्वतःला विकत असतो. स्वतःला विकणे म्हणजे पैशासाठी काहीही करायला मी तयार आहे आहे, असे नाही. तर दुसऱ्याच लक्ष्य स्वत:वर ओढवणे दुसऱ्यांना म्हणने मी चांगला आहे. माझी निवड करा. आपण जीवनात स्वत:ला विकतच असतो. आपल्याकडची गोष्ट किंवा आपल मत इतरांना पटवून देणे हि विक्रीकलाच आहे.

व्यवसाय म्हणजे काय ? वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी विक्री. म्हणजे जेव्हा लोक तुमच्याकडून विकत घेतील, तेव्हा तुम्ही व्यवसाय करू शकाल. आता लोकांनी तुमच्याकडे येण्याची तुम्ही वाट पाहणार की त्यांच्या जवळ जावून तुम्ही बोलणार माझ्याजवळून विकत घ्या ?

आपला समाजात विकणाऱ्या व्यक्तीकडे हीन भावनेने पहिले जाते. असे समजल्या जाते , जो विकू पाहतो, त्यात काही कमी आहे. जर कोणती वस्तू तुम्ही चांगली बनवली आहे. लोकांचा ती वापरून फायदा होणार आहे. तर त्याची जाहिरात का करू नये ? जर आपण जाहिरात केली नाही तर लोकांना आपल्याबद्दल कसे कळेल ? आपण जर फक्त असे बोललो कि माझा ग्राहक माझी प्रशंसा करेल तोच माझी जाहिरात. तर त्याप्रमाणे तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता किती वेळ लागेल ?

आपण काही विकतोय म्हणजे आपल्यात काही कमी आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाका. मी उत्पाद तयार केले आहे. मला वाटत लोकांचा ते उत्पाद वापरून फायदा होईल. हे उत्पाद लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचे फायदे लोकांना कळविणे हे माझ काम आहे, हा विचार करा. तुमचा व्यवसाय तुम्हाला जर वाढवायचा नसेल, तर जाहिरात करू नका. पण तुम्हाला व्यवसायच वाढवायचा असेल, नवीन ग्राहक जोडायचे असतील, तर मात्र तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावेच लागेल. कसे विकावे ? याविषयावर संपूर्ण एक लेख मी लिहिला आहे तो लेख तुम्ही इथे वाचू शकता.

संयम

व्यवसाय करणे हे रात्रीच्या काळोखात दिव्याचा प्रकाशाकडे चालत जाणे आहे. आपल्याला कुठे जायचे हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला किती लांब जायचे आहे, हे आपल्याला माहित नाही. अंधारात आपल्याला अंदाज येत नाही कि तो प्रकाश किती दूर आहे. आपण त्या दिव्याच्या प्रकाशाकडे चालत राहतो. आपल्याला वाटत फार वेळ झाला आपण चालतोय. अजून किती दूर आहे तो प्रकाश ? परत जाऊ का ? कि दुसरा प्रकाश शोधू मी ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात यायला सुरवात होते.

व्यवसायात उतरताना आपल्याला आपल ध्येय माहित असत. आपला व्यवसाय आपल्याला केवढा वाढवायचा आहे. त्यात झालेल्या कमाईने आपण काय काय विकत घेऊ ? याची पण यादी बनलेली असते. आपल यश कसे असेल, याच एक चित्र आपल्या डोक्यात असत. पण तिथपर्यंत कस पोहोचायचे ? कधी पोहोचणार ? पोहचू कि नाही ? पोहोचलो तर टिकू का नाही ? असे अनेक प्रश्न मनात येतात. या गोंधळातच अनेक जण माघार घेतात. व्यवसाय सुरु करण्याधी, अशा स्थितीचा विचार करा. या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकून राहणार का ?

कोका कोला कंपनी जेव्हा सुरु झाली तेव्हा ती दिवसाला ९ bottle विकत होती.आज कोका कोला कंपनी पूर्ण जगभर दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकते. यावरून तुम्हाला कळून येईल कि व्यवसाय करताना किती संयम लागतो. फक्त ९ bottle विकल्या जातात म्हणून जर कोका कोला थांबले असते तर ते आज दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकू शकले असते का ?

वातावरण

तुमच्या व्यवसायामध्ये असे वातावरण असले पाहिजे कि कर्मचारी येऊन तुम्हाला नवीन कल्पना सांगू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर रागावता वा बदला घेता कामा नये.

नेहमी घडणाऱ्या गोष्टींसाठी एक आदर्श नियमावली बनवली पाहिजे. म्हणजे तुमचे कर्मचारी दरवेळी तुमच्याकडे येणार नाहीत. त्यांना माहित असेल कि आपण अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे.

कर्मचाऱ्यांची प्रशंसा सर्वांसमोर करा, पण चुका एकट्यात काढा. तुमच्या व्यवसायामधल्या इतर सर्व गोष्टींची किंमत कमी-कमी होत जाईल, फक्त कर्मचारी सोडून. प्रशिक्षण आणि अनुभवामुळे कर्मचाऱ्यांची किंमत वाढतच जाईल. कर्मचारी आपले गुलाम आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्या. असा दृष्टीकोन न ठेवता, कर्मचारी हे आपले व्यवसायाचे साथीदार आहेत, हा व्यवसाय वाढवायला तेच मदत करतील. असा दृष्टिकोन असावा.

तुम्ही व्यवसायाचे नेता आहात, तुम्ही निष्पक्ष ठाम, मैत्रिपुर्वक आणि दूरदृष्टी ठेऊन काम केले पाहिजे.

भाव करणे

कोणत्याही वस्तूचे मूल्यं कशावर ठरतं ? एखाद्या प्लॉटची किंमत कोणी १० लाख ठरवेल, तर कोणी ७ लाख तर कोणी १५ लाख. मग त्या प्लॉटच मूल्यं काय ?

कोणत्याच गोष्टीला ठराविक मूल्यं नसत. कोणत्याही गोष्टीच मूल्यं हे विकत घेणारा आणि विकणारा हे दोघ स्वीकारतील ते असतं. म्हणून व्यवसाय करताना आपल्याला भाव करता आला पाहिजे. भाव करताना कोणाकडे शक्ती आहे, ते पहिले जाणून घ्या. हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.

भाव कशावर ठरतो ?

  1. माहिती – त्या मालाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे ? भविष्यात त्याची किती उपलब्धता असेल ? ते कोण विकत घेईल ? ते कुठे विकत मिळेल ? तुम्हाला जितकी जास्त माहिती तितकी तुमची बाजू मजबूत.
  2. वेळ – माझ्या एका मित्राला अर्जंट फोटो फ्रेम तयार करून हवी होती. दुसऱ्या दुकानात फिरून भाव करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. दुकानदाराला कळलं, ह्या माणसाकडे वेळ नाही. त्यामुळे तो त्याचा भाव सोडायला तयार नव्हता. लवकरात लवकर सामान पाहिजे असेल, तर त्याची जास्त किंमत मोजावी लागते.

वाटाघाटी करताना, मला माझ्या प्रश्नाच्या शेवटी दुसरा पर्याय जोडून माझी विनंती नम्र करण्याची सवय आहे.

“तुम्ही सवलत देऊ शकता का – की हे शक्य नाही?”

शेवटचा भाग वगळा. तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टीच विचारा. त्यांना नाही म्हणायला मदत करणे तुमचे काम नाही.

“तुम्ही सवलत देऊ शकता का ?”

– James Clear

Win-Win

भाव करताना सर्वात चांगली स्थिती कोणती ? जिथे तुम्ही पण जिंकता आणि समोरचा पण जिंकतो. असे झाले तरच दोन्ही बाजूचे लोक खुश होतील. एकमेकांशी भविष्यात परत परत व्यवहार करतील. फक्त तुम्ही जिंकलात किंवा समोरचा जिंकला, तर तो व्यवहार परत होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते.

भाव करताना कधीच एका गोष्टीवर अडून राहू नका. अशा वेळी जिंकणे व हरणे केवळ हाच पर्याय उरतो. कधीच गृहीत धरू नका, समोरच्याला काय पाहिजे हे तुम्हाला माहित आहे म्हणून. प्रत्येक माणूस वेगळा आहे. भाव करताना तो वेगळा विचार करतो. पैसाच सर्वकाही नसतो भाव करताना. भाव हा नेहमी दोन पक्षांवर अवलंबून असतो.

नफा

व्यवसाय करण्याचा मूळ उद्देश हाच आहे कि नफा मिळवणे. यावर्षी आपण बातम्यांमध्ये पाहिले अनेक online कंपनी बंद झाल्यात. त्या कंपनी नफा बनवत नव्हता. नफा न बनवणारा व्यवसाय जास्त वेळ चालवणे फार कठीण काम आहे. वाढीसाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. पण कर्ज किती घ्यावे ? ते कसे फेडणार ? हे तुम्हाला ठरवावं लागेल. सर्वात उत्तम हेच आहे कि, तुम्हाला होणारा नफा हा तुमच्या व्यवसायाच्या वाढीकरिता वापरावा. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणे जास्त धोकदायक आहे. त्यामुळे कर्जाच्या चक्रात सापडू शकता. तुम्ही सामान कितीला विकणार आहे ? कितीला विकत घेणार आहे ? तुमचा नफा किती ? ह्याच गणित करूनच व्यवसाय सुरु करा.

अनेक लोकांना व्यवसाय सुरु करायचा असतो. काहीना तो चालवायचा असतो आणि फार कमी लोकांना तो टिकवायचा असतो. व्यवसाय करणे म्हणजे शिकत राहणे.

व्यवसाय करायला पैसा नसेल तर काय करावे ?

व्यवसायाकरिता निधी उभारण्यासाठी आपण कमीत कमी ४ प्रकारच्या भांडवलाचा वापर करू शकता:

– आर्थिक भांडवल (पैसे)
– मानवी भांडवल (कर्मचारी)
– सामाजिक भांडवल (संबंध)
– मानसिक भांडवल (इच्छा)

आपल्याकडे पैसे नसल्यास, सर्जनशील व्हा आणि इतर ३ चा वापर टिकण्यासाठी करा (किंवा पैसा मिळविण्यासाठी).

– James Clear

हा लेख लिहताना मला या पुस्तकाची मदत झाली.

इतर लेख तुम्ही इथे वाचू शकता

पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या चला संपत्ती निर्माण करूया

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

40 thoughts on “कोणता व्यवसाय सुरु करावा ? व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?”

  1. सर खरच खूप चांगला निस्वार्थ सल्ला दिला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद,

    Reply
    • पुढे येणारे लेख वाचण्याकरिता Email alert ला subscribe करा.

      Reply
  2. खूपच उपयुक्त माहिती तुम्ही दिली आहेत .
    मला ही व्यवसाय करायचा आहे .आणि तुमचं लेख वाचून मला भरपूर युक्ती सुचली आहे की नक्की मी कोणते व्यवसाय करू शकते .
    धन्यवाद

    Reply
  3. धन्यवाद ही अमूल्य माहिती दिल्या बद्दल!
    तुम्ही कोणत्या शहरात राहता?

    Reply

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.