गुंतवणुकीचे प्रकार कोणते ? कोणता निवडावा ?

गुंतवणुकीचे प्रकार बरेच आहेत. सध्या आपण त्यात मुख्य फरक काय ते पाहूया. प्रत्येक गुंतवणुकीबद्दल सविस्तर माहिती पुढील येणाऱ्या लेखात पाहूच. म्युच्युअल फंड, शेयर मार्केट बद्दल मला इतर गुंतवणुकीच्या प्रकारांपेक्षा जास्त माहिती असल्यामुळे, त्यांच्याबद्दल मी जास्त बोलेन.

पहिल्या लेखात गुंतवणूक म्हणजे काय ? ते पाहिले. दुसऱ्या लेखात गुंतवणूकदार म्हणजे काय ? ते पाहिले. आता गुंतवणुकीचे प्रकार पाहूया.

गुंतवणुकीचे प्रकार

बहुतेक लोकांना माहित असलेले गुंतवणुकीचे प्रकार म्हणजे

TYPES OF INVESTMENT
गुंतवणुकीचे प्रकार

१. जमीन

२. सोन

३. व्यवसाय

४. FD (मुदत ठेव)

आपले काम आहे की आपल्या उद्देशानुसार योग्य गुंतवणूक निवडणे. क्रिकेटचा संघ निवडतांना आपण जसे वेगवेगळे खेळाडू त्यांच्या कौशल्यानुसार निवडतो. तसे करताना आपण खेळपट्टी कश्या प्रकारची आहे, सामना कोणत्या संघाशी आहे ह्या गोष्टींचा विचार करतो. तसाच विचार गुंतवणूक करताना आपल्याला करावा लागतो. योग्य गुंतवणूक कशी करावी समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्यामधील फरक आधी समजून घ्यावा लागेल.

अस्थिरता ( Volatility)

अस्थिरता म्हणजे काय ? ती का येते ?

गुंतवणुकीचे प्रकार समजण्यासाठी आधी अस्थिरता काय असते ते समजणे फारच आवश्यक आहे.

समजा तुम्ही जमीन विकत घेतली आहे, अशी बातमी आली कि तिथून आता फार मोठा राष्ट्रीय मार्ग तयार होणार आहे. आता जमिनीच्या किमती लगेच वाढू लागतील.

पण एक वर्षात सरकार बदलले. नवीन सरकार आले. त्या सरकारने ठरवले हा चुकीचा मार्ग आहे, राष्ट्रीय मार्ग दुसऱ्या गावाने जायला हवा, आता काय होईल ?

volatility
अस्थिरता

वरील चित्र पाहिले ? किमती मध्ये होणारा बदल, हि झाली अस्थिरता. अस्थिरता येणाचे कारण अपेक्षेविरुद्ध काही घडणे.

आता समजा तुम्ही A वर जमीन विकत घेतली. आज D वर, तुम्ही गुंतविलेल्या रक्कमेपेक्षा जमिनीची किमत जास्त आहे. कारण तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे. पण समजा तुम्ही गुंतवणूक B आणि C च्या मधे कुठे पण केली असती. तर आज तुम्हाला नुकसान पण होऊ शकले असते. साधारण लोक काय करतात ? सर्वाना बातमी माहिती झाल्यावर विकत घ्यायला सुरु करतात. पण तेव्हा उशीर झालेला असतो. बातमी सर्वांना कळल्यामुळे त्या गोष्टीची किंमत आता फार वाढली असते. दिर्घकाळाकरिता गुंतवणूक केली नाही तर अस्थिरतेच्या लाटे मध्ये आपण हरवू शकतो. C वर गुंतवणूक करून तुम्ही D येथे फार मोठे नुकसान सहन कराल. अल्पकालीन गुंतवणुकीमध्ये हे शक्य आहे.

वरील चित्र हे फक्त उदाराहणं दाखल आहे. जमिनीचे भाव नेहमी एवढे बदलतात असे नाही. हो पण शेयर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये ते नक्कीच एवढे बदलतात.

आपण शेयर मार्केट मध्ये किती अस्थिरता असते ते पाहूया.

१ दिवसाचा तक्ता

तक्ता १ महिन्याचा

१ वर्षाचा तक्ता

१० वर्षांचा तक्ता

FD मध्ये तुम्हाला इतकी अस्थिरता दिसून येणार नाही. याचा अर्थ हा आहे कि काही गुंतवणुकीचे प्रकार मध्ये अस्थिरता जास्त असते काही गुंतवणुकीचे प्रकार मध्ये अस्थिरता कमी. पण आपण जर दिर्घकालाकरिता गुंतवणूक केली तर आपण अस्थिरता फार कमी करू शकतो.

तर आपल्याला असे दिसून येईल कि आपण गुंतवणूक कधी करतो यावर आपला परतावा अवलंबून आहे. आणि आपल्याला असे दिसून येईल कि दिर्घकालामध्ये अस्थिरता हि फार कमी असते. मागचे जमिनीचे उदहरण पाहू. लघुअवधित जागेची किमत फार बदलली. पण येणाऱ्या १०-१५ वर्षात त्या जागेवर चांगला मार्ग हा होणारच. म्हणजे त्याची किंमत वाढेलच. म्हणून आपण दीर्घावधी चा विचार केला पाहिजे. तर आपल्या गुंतवणुकीमधील धोका कमी होऊन जाईल.

वरील तक्त्या प्रमाणे १० वर्षे गुंतवून राहणाऱ्याने पैसे बनवले आहे, पण फक्त १ वर्ष गुंतवून राहणारा पैसे बनवेल कि नाही हे सांगता येत नाही.

गुंतवणूक करताना मुख्य २ घटक विचारात घेतात :

१. धोका (Risk) आणि कालावधी (Time Period)

२. तरलता (Liquidity)

धोका आणि कालावधी

समजा तुमच्याकडे ३० हजार आहेत. आणखी २० हजार तुम्हाला ६ महिन्यांनी मिळणार आहेत. ते मिळाले की, ह्या पैशांनी तुम्ही नवीन गाडी विकत घेणार आहात.

तुम्ही म्हटलं, चला ही ३० हजारांची रक्कम ६ महिने कुठे तरी गुंतवूया. आता तुम्ही ही रक्कम जास्त अस्थिरता असणाऱ्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये लावली तर ३० हजार कमी पण होऊ शकतात. अशावेळी शेयर मार्केट किंवा Equity म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य पर्याय नाही. अल्पवधीमध्ये FD किंवा डेब्ट म्युच्युअल फंड हा पर्याय योग्य राहील.

याउलट समजा, तुम्ही तारुण्यामध्येच स्वतःच्या निवृत्ती साठी गुंतवणूक करत आहात. आता तुमचा गुंतवणुकीचा कालावधी फार मोठा आहे. अशा वेळी तुम्ही जास्त अस्थिरता असलेल्या, म्हणजेच जास्त धोका असलेल्या गुंतवणुकी मध्ये पैसे लावू शकता. या परिस्थितीत FD किंवा डेब्ट म्युच्युअल फंड योग्य पर्याय असणार नाही. दिर्घवधीसाठी शेयर मार्केट किंवा equity म्युच्युअल फंड हा पर्याय योग्य राहील.

दिर्घअवधी मध्ये आपण जास्त अस्थिरता असलेल्या प्रकारांमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. कारण आपल्याकडे वेळ भरपूर असतो. त्यामुळे अल्पकालावधी मध्ये अस्थिरतेमुळे जर आपली रक्कम कमी जरी झाली, तरी आपण ती काढणार नसल्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. अशावेळी संयमाने आपण गुंतवून राहिल्यास अपल्याला चांगला परतावा मिळेल. FD मध्ये तुम्हाला जवळपास तेवढाच परतावा मिळेल जेवढी महागाई आहे. जास्त अस्थिरता असलेल्या गुंतवणूक मध्ये जास्त परतावा आणि जास्त धोका असतो.

पण बहुतेक लोकांना लवकरात लवकर पैसा हवा असतो. मग ते अस्थिर जागी अल्पकाळासाठी गुंतवणूक करतात. मग पैसा गमवून बसले का गुंतवणुकीला दोष देत राहतात. गुंतवणुकीला दोष देऊन काही फायदा नाही. चूक आपली आहे. आपण आपल्या उद्देशानुसार गुंतवणूक निवडली नाहीये. त्यामुळे नुकसान झाले.

१ दिवस ते अनंतकाळाकरिता गुंतवणुकीचे प्रकार उपलब्ध आहेत. आपली गरज ओळखून तो निवडावा.

अल्पकालावधी मध्ये पैसे टिकवणे आणि दिर्घकालावधी मध्ये पैसे वाढवणे हा उद्देश असला पाहिजे.

सोपे सूत्र

अल्पावधी – अस्थिरता कमी – धोका कमी – परतावा कमी

दिर्घअवधी – अस्थिरता जास्त – धोका जास्त – परतावा जास्त

तरलता

तुम्ही १० लाखाचे घर घेतले. पण आजारपणामुळे तुम्हाला १ लाखाची गरज आहे. मग अश्या वेळी काय करणार ? आपल्या घराचा एक छोटा भाग तर आपण विकू शकत नाही ना ? त्याचे दरवाजे खिडक्या काढून विकू शकतो का ? आणि तुम्ही विकायला तयार जरी असाल तरी वेळेवर घेणारा तुम्हाला भेटेल कुठे ? म्हणून गुंतवणूक करताना तुम्हाला विचार करावा लागेल कि किती सहजपणे तुम्ही हि गुंतवणूक विकू शकता. समजा लवकरच तुमच्या घरी लग्न असेल, त्यासाठी असलेले पैसे तुम्ही घर, जमीन मध्ये गुंतवू शकत नाही. आणि तुम्हाला जर त्या पैश्याचे १५-२० वर्ष काम नसेल तर तुम्ही ते जमीन किंवा घर मध्ये गुंतवू शकता.

सर्वात तरल संपत्ती म्हणजे रोख रक्कम. त्याला विकण्याची गरज नाही. आपण सरळ त्याची देवाण घेवाण करू शकतो. त्यानंतर थोडी कमी तरलता असलेली गोष्ट म्हणजे FD. ती काढण्याकरिता तुम्हाला बँकेच्या वेळेत जावे लागेल किंवा तुम्हाला इंटरनेट बँकिंग आली तर लगेच FD तुमच्या खात्यात जमा होईल. त्याच समान पातळीवर असलेली दुसरी गुंतवणूक म्हणजे Liquid Mutual Fund. त्या मध्ये पण हि सुविधा आपल्याला मिळते. आणि जवळपास सारखाच धोका असतो.

घरातील सामान विकणे किंवा घर विकणे हे फार कठीण काम आहे. घर विकायला वेळ लागतो. त्यामुळे हि गुंतवणूक फारच कमी तरल आहे.

गुंतवणुकीचे प्रकार

गुंतवणूक कशात करावी, हे ठरवताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते आपण पहिले. आता गुंतवणुकीचे प्रकार पाहूया.

बाँड

जेव्हा एखादी कंपनी किंवा सरकार तुम्हाला म्हणते कि तुम्ही आम्हाला x रु द्या. त्या बदल्यात ठराविक कालावधीने आम्ही तुम्हाला x+y एवढी रक्कम देऊ त्याला म्हणतात बाँड. बाँड म्हणजे एका प्रकारे कंपनी किंवा सरकारला दिलेले कर्ज च होय. तुम्ही बाँड एका प्रकारची fd समजू शकता.

सरकारी बाँड मध्ये धोका कमी असतो. कारण त्यात सरकार पैश्यांची हमी घेते. कंपनी बाँड मध्ये धोका थोडा जास्त असतो.

बाँड मध्ये गुंतवण्याचा एक धोका असा असतो, कि तुम्ही फार दीर्घकाळासाठी आधीच किती व्याज मिळणार हे ठरवलं आहे. समजा तुम्ही २० वर्षांआधी ठरवल आहे कि तुम्हाला बाँड वर ७% ने परतावा मिळेल पण आजची परिस्थिती पाहता महागाई पण ६% आहे. तर अश्यावेळी तुम्हाला जी रक्कम २० वर्षांआधी फार मोठी वाटत होती ती आजच्या तुलनेत कमी वाटेल. याउलट पण होऊ शकते. जसे आजच्या परिस्थिती मध्ये लोकांना ६ % परतावा मिळतोय पण काही वर्षाआधी ज्यांनी बाँड १० % घेतला आहे त्यांना आज पण १०% नि व्याज मिळतोय.याचाच अर्थ असा कि बाँड मधील गुंतवणुकी मध्ये व्याज दराचा धोका असतो.

शेयर

शेयर म्हणजे व्यवसायाचा भागीदार होणे. जितके तुमच्याकडे जास्त शेयर, तेवढे मोठे तुम्ही कंपनीचे मालक.

आता तुम्ही शेयर घेता म्हणजे ते पैसे व्यवसायात लावता. व्यवसाय चालेल की नाही ? किती चालेल ? हे आपण निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला किती परतावा मिळेल हे पण निश्चित नसते. त्यामुळे शेयर घेणे फार धोकादायक आहे. मग शेयर का विकत घ्यावे ? कारण चांगल्या व्यवसायात आपल्या पैश्याला चांगला परतावा मिळतो. आज अनेक भारतीय कंपनी युरोप, अमेरिका येथील व्यवसाय विकत घेत आहे. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की चांगल्या व्यवसायात किती वाढ होऊ शकते.

व्यवसायात अनेक गोष्टी पटापट बदलत असल्यामुळे आणि शेयर ची विक्री करणे फार सहज असल्यामुळे अस्थिरता जास्त असते.

म्युच्युअल फंड

अनेक लोकांकडून पैसा जमा करून तज्ञाकडून तो गुंतवणे, याला म्हणतात म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड बऱ्याच प्रकारचे असतात. आपल्याला उद्देशानुसार म्युच्युअल फंडनिवडणे आपले काम असते. हे आपण स्वतः करू शकतो किंवा वितरकाची मदत घेऊ शकतो, वितरकाची मदत हवी असल्यास येथे क्लीक करा.

जी कंपनी म्युच्युअल फंड चे काम सांभाळते तिने चुकीचे जागी गुंतवणूक केली तर नुकसान होवू शकते. त्याकरिता वेगवेगळ्या कंपनी मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येते. पण शेवटी म्युच्युअल फंड गुंतवणूक कुठे करतोय यावर परतावा अवलंबून असतो. म्युच्युअल फंड मध्ये आपण जी गुंतवणूक केली आहे, यात मार्केट रिस्क असते. म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळतील हे निश्चित नसून, त्या वेळी मार्केट मध्ये तुम्हाला किती मूल्य मिळते, यावर अवलंबून असते. म्युच्युअल फंड हे १ दिवस ते अनंतकाळ पर्यंत कालावधी साठी आपण वापरू शकतो. फक्त आपल्याला आपल्या गरजेनुसार योजना निवडणे आवश्यक आहे.

FD (मुदत ठेव)

बँकेत ठराविक कालावधी साठी आपण पैसे जमा करतो. आणि तेव्हाच आपल्याला माहित असत, कि आपल्याला किती परतावा मिळेल हा पर्याय सर्वाना परिचित आहे. बहुतेक लोक, हाच पर्याय निवडतात. कारण यात किती रक्कम निश्चित मिळेल याची हमी असते. जास्त अस्थिरता नसते. जेवढे ठरले तेवढेच पैसे मिळतात. ना कमी ना जास्त.

गुंतवणूक या लेखात आपण आईस्क्रीम चे उदाहरण पाहिले होते. १०० ची आईस्क्रीम एक वर्षाने १०६ ची झाली. आपण fd केली तर ६% ने आपल्याला वाढलेली रक्कम मिळेल. पण आईस्क्रीम सोबत चॉकलेट घेता येईल का ? त्या साठी तुम्हाला १५% परतावा लागेल. म्हणजे fd फक्त तुम्हाला महागाई वाढतेय तेवढी तुमची संपत्ती वाढवायला मदत करेल. पण महागाईला हरवून संपत्ती वाढवण्यात अपयशी ठरेल. याचाच अर्थ हा कि fd मध्ये पैसे लावून तुम्ही फक्त तुमच्या पैश्याचं मूल्य कमी होण्यापासून वाचवू शकता. त्यापासून संपत्ती निर्माण करू शकत नाही. fd अल्पकालावधी च्या गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही ठराविक वेळेआधी fd मोडली तर तुम्हाला फक्त सेविंग बँक च्या व्याजदराने पैसे मिळतात, fd च्या नाही.

FD पूर्णपणे सुरक्षित आहे, हा एक भ्रम आहे.

DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) ही RBI ची उपकंपनी आहे. DICGC चे काम आहे सर्व बँक मध्ये जमा असलेल्या रक्कमेचा विमा काढणे. ही संस्था फक्त ५ लाखापर्यंत विमा काढते. समजा तुमचे खात x बँक मध्ये आहे, त्यात तुमचे १५ लाख आहे. जर ती बँक दिवाळखोर झाली, तर तुम्हाला फक्त ५ लाख मिळतील. पण समजा तुमचे २ बँकेत १५ -१५ लाख आहेत. आणि दोन्ही बँका दिवाळखोर झाल्या तर तुम्हाला प्रत्येक बँकेचे ५-५. तुमचे १० लाखाची fd असली तरीही. बँक दिवाळखोर होणे ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणून आपण fd ला सुरक्षित गुंतवणुकीचे प्रकार समजतो. पण बँक दिवाळखोर होणारच नाही, ही शक्यता नाकारता येत नाही. इथे सांगण्याचा उद्देश फक्त हाच की, प्रत्येक गुंतवणुकीमध्ये धोका असतो. फक्त तो कमी जास्त प्रमाणात असतो. पण धोका असतोच. सर्वच बँक DICGC अंतर्गत विमा केलेल्या नाहीत. तुमची आहे का ? तुम्ही येथे तपासू शकता.

कला, इतर संग्रहात्मक वस्तू

मुद्रांक, नाणी, चित्रकला, प्राचीन वस्तू यासारख्या गोष्टींमध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. फक्त आपल्याला त्यांची अचूक किंमत ओळखता आली पाहिजे. त्यांना अनेक वर्ष जपून ठेवता आले पाहिजे. अश्या गोष्टी चोरीला जाण्याची भीती असते. सोबतच नैसर्गिक आपदा वगेरे मध्ये अश्या गुंतवणूक आपण गमवू शकतो.

सोनं

आपल्याकडे अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते. विशेष करून महिलांना. कारण सोने आभूषण म्हणून पण आपण वापरू शकतो.

भावनिकरीत्या विचार केला तर ते ठीक आहे. पण आपण मागील गुंतवणूक या लेखात पहिले आहे. सोन्यात गुंतवलेले १० हजार १५ वर्ष्यात ७२ हजार झाले. तर शेयर मार्केट ला तेच १० हजार २.३८ लाख झाले असते आणि म्युच्युअल फंड ला त्याहीपेक्षा जास्त. त्यामुळे शेयर मार्केट मध्ये सरळ किंवा म्युच्युअल फंड मार्फत गुंतवणूक करणे दिर्घ कालावधी साठी सोन्यापेक्षा चांगले आहे.

शिवाय सोन्याचे दागिने बनवताना व विकताना आपल्याला मजुरी द्यावी लागते. त्यामुळे सोन्याची किमत अजून कमी होते. सोने चोरीला जाऊ शकते, त्यासाठी तुमच्या घरी दरोडा पडू शकतो. तुमच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो.

जे सोन तुम्ही विकत घेता ते तुमच्या घरी कपाटात पडून राहते. त्याचा समाजाला काही जास्त फायदा होत नाही. पण व्यवसायात लावलेले पैसे अनेकांना रोजगार देतात. त्याचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशात सोने हे इतर राष्ट्रांकडून येत. त्यामुळे आपल्या देशाचा पैसा बाहेर जातो.

यावर उपाय काय ?

सोने घेताना आपण खालील पर्यायाचा विचार करू शकतो.

१. गोल्ड सोवेरिअन बॉंड ( Gold Sovereign Bond)

२. गोल्ड ETF

१. गोल्ड सोवेरिअन बाँड

भारत सरकारतर्फे गोल्ड बॉंड सुरु करण्यात आले आहे. त्यात तुम्हाला दरवर्षी २.५ % दराने व्याज मिळतो. तुम्ही सोन विकत न घेता त्याच प्रमाणपत्र घेता. ८ वर्ष्याने तुम्हाला तेव्हा असलेली सोन्याची रक्कम अधिक दरवर्षी २.५ % व्याज मिळेल. त्यामुळे तुम्हाला दागिने बनवताना, विकताना लागणारा खर्च येणार नाही. तुमच सोने चोरीला जाणार नाही. आणि तुमची सोन्यात गुंतवणूक होवून तुम्हाला अधिक दरवर्षी २.५ % व्याज पण मिळेल.

२. गोल्ड ETF (Exchange Traded Fund)

हे फंड stock exchange वर विकता येतात किंवा विकत घेता येतात. म्हणून त्यांना exchange traded fund म्हणतात. यात पण तुमहाला प्रमाणपत्र मिळते. खरे सोने ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे ते चोरीला जाने किंवा हलक्या दर्ज्याच सोन तुम्हाला मिळण्याचा धोका नाही. जेवढ सोन तुम्हाला घ्यायाचा तेवढे रुपये च गोल्ड etf युनिट तुम्ही घेऊ शकता.

जमीन

जमीन घेताना सर्वात मोठी समस्या हि आहे कि, आपल्याला गुंतवणूक करायला फार मोठी रक्कम लागते. बहुतेकजण जर पूर्ण जीवनात फक्त एकच घर किंवा जमीन घेऊ शकतात. म्युच्युअल फंड मध्ये आपण ५०० दरमहा पण गुंतवणूक करू शकतो. पण जमीन, घर घेताना तसे नाही. पण जमीन घेण्याचा फायदा हा आहे कि तुम्ही त्यात जास्त काळ गुंतवून राहता. जमिनीचे दर तुम्हाला रोज कळत नाही. तसेच जमीन विकणे सहज काम नाही. त्यामुळे तुम्ही भावनिक निर्णय घेत नाही. घर, जमीन यामध्ये दीर्घ कालीन गुंतवणूक केल्यामुळे त्यात फायदा होतो. पण जमीन घेताना पण तुम्हाला अनेक गोष्टीचा विचार करावा लागतो. कुठेही जमीन घेतली तर त्याची रक्कम फार चांगली वाढेल असे नाही. कुठे जमीन घ्यावी हा पण सविस्तर अभ्यासाचा विषय आहे.

TAX (कर)

गुंतवणुकीचा पर्याय निवडताना ह्या घटकाचा देखील विचार केला पाहिजे. प्रत्येक गुंतवणुकीमध्ये वेगवेगळे कर असतात. वेगवेगळे lock in period असतात. lock in period म्हणजे असा कालावधी ज्यात तुम्ही पैसे काढू शकत नाही किंवा काढले तर तुम्हाला काही भुर्दंड भरावा लागेल. Tax मध्ये २ मुख्य प्रकार आहेत:

१. STCGT ( SHORT TERM CAPITAL GAIN TAX) अल्पकालावधीसाठी

२. LTCGT (LONG TERM CAPITAL GAIN TAX) दिर्घकालावधीसाठी

प्रत्येक गुंतवणुकीचे प्रकार मध्ये कालावधीची मर्यादा वेगवेगळी असते. आपण संपत्ती विकून जो नफा कमावतो, त्यावर हा कर लागतो. शेयर मार्केट मध्ये STCGT चा कालावधी एक वर्ष असतो, तर जमीन, घर साठी ३ वर्ष. तसेच तो किती प्रमाणात लागेल हे पण गुंतवणुकीचे पर्याय वर अवलंबून असते. शेयर मार्केट मध्ये १ वर्ष्यानंतर आणि घर,जमीन मध्ये ३ वर्षांनंतर LTCGT लागतो, शेयर मार्केट मध्ये याच प्रमाण ० % आहे. म्हणजे १ वर्षानंतर तुम्ही मिळवलेल्या नफ्यावार कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. याबद्दल सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढील लेखांमध्ये पाहू.

INCOME TAX (उत्पन्न कर )

सरकारी अनेक योजना मध्ये आपल्याला उत्पन्नाच्या करत सूट मिळते. पण lock-in period गुंतवणुकीचे पर्याय साठी वेग वेगळा असतो.

गुंतवणुकीचे पर्यायLOCK-IN PERIOD
NSC, BANK FD५ वर्षे
ELSS३ वर्षे
NPSनिवृत्ती
SCSV५ वर्षे
INSURANCEपॉलिसी कालावधी
SUKANYA SY१८ वर्ष मुलीच वय
PPF१५ वर्षे
कालावधीगुंतवणुकीचे प्रकार
१-१५ दिवसULTRA SHORT TERM DEBT FUND. LIQUID FUND, SAVING ACCOUNT
15 दिवस – 1 महिनाSHORT TERM DEBT FUND, LIQUID FUND, FD
१ महिना – १ वर्षDEBT FUND , FD
१ – ३ वर्षBALANCED FUND, FD
३-७ वर्षDIVERSIFIED EQUITY FUND
७ वर्ष पुढेEQUITY FUND, जमीन व्यवसाय

जीवनात आपल्याला फक्त गुंतवणुकीचा एकच प्रकार वापरून काम होत नाही. वेगवेगळे प्रकार आपल्याला जीवनात आवशक्यतेनुसार वापरावे लागतात. निवड करताना नीट विचार करून निर्णय घ्या.

गुंतवणूक कशी करावी ?

वर आपण गुंतवणुकीचे प्रकार पाहिले, यावरून तुम्हाला गुंतवणुकीबद्दल काही अंदाज आलाच असेल. आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक केली पाहिजे.

जर तुम्हाला ही गोष्ट कठीण वाटत असेल तर तुम्ही यात आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड वितरकाशी संपर्क करण्याकरिता खाली दिलेला फॉर्म भरू शकता.

हा लेख लिहिताना मी वाचलेली काही पुस्तके, जी तुम्ही पण वाचू शकता. विकत घेण्यासाठी पुस्तकावर क्लिक करा.

सर्वात चांगली गुंतवणूक कोणती ? इथे मतदान करा.

इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

9 thoughts on “गुंतवणुकीचे प्रकार कोणते ? कोणता निवडावा ?”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.