हल्दीराम पाच हजार कोटींच्या साम्राज्याची यशोगाथा

हल्दीराम पाच हजार कोटींच्या साम्राज्याची यशोगाथा

हल्दीराम पाच हजार कोटींच्या साम्राज्याची यशोगाथा का आणि कोणी वाचावे ?

हॉटेल व्यावसायिकांनी नक्की वाचावे असे पुस्तक.

शून्यातून सुरवात करून एवढे मोठे साम्राज्य उभे कसे झाले याची कथा.

आपले गुण वापरून कसे जिंकावे याची कथा.

व्यवसायात कुटुंबामुळे काय फायदे आणि काय नुकसान होतात याची कथा.

दोन पिढ्यांमधील विचारांतील फरकांची कथा.

आणि बरेच काही, नक्कीच वाचावे असे पुस्तक.

‘Bhujia Barons’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद, हल्दीराम पाच हजार कोटींच्या साम्राज्याची यशोगाथा.

हल्दीराम

भारतीय ग्राहक केवळ ताज्या उत्पादनांकडे आकर्षित होतात. ज्या काळात भुजिया फक्त एक आठवडा टिकत होते, तेव्हा कंपनीने अज्ञात मार्ग निवडला, धोका पत्करला आणि सहा महिने टिकतील असे भुजियाचे उत्पादन तयार केले. जेणेकरुन ते भारतभर ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील.

“हल्दीराम” यांचे खरे नाव “गंगा भीषण अग्रवाल” होते. ते लहान असतानाच त्यांच्या आईने त्यांना, त्यांच्या वास्तविक नावाने संबोधणे थांबवले होते. “हल्दीराम” हे टोपण नाव त्यांच्यासोबत कायम राहिले.

सत्तरीतही हल्दीराम हे उंच, चपळ आणि तंदुरुस्त होते. त्यांची उंची ६ फूट होती. आज त्यांची नातवंडे त्यांचा उद्योग बिकानेर, कोलकाता, नागपूर आणि दिल्ली येथे सांभाळत आहेत.

हल्दीराम

त्याकाळात मुलांना १० व्या वर्षीच प्रौढ समजले जायचे. १९०८ मध्ये जेव्हा हल्दीराम यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आजोबांचे वय ३३ होते.

लहानपणी, हल्दीराम नेहमी चुलीजवळ फिरत असत, स्त्रियांना मदतीची आवश्यकता आहे का विचारत.

जेव्हा हल्दीराम केवळ ११ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी ठरवले की हल्दीराम स्वत:ची जबाबदारी उचलण्या योग्य झाला आहे. त्यांचे चंपा देवीशी लग्न लावले.

भुजिया

हल्दीराम यांना एक आत्या होती त्यांना ते बिखी बुवा म्हणत. बिखी बुवाच्या सासूने घरी एक अल्पोपहार म्हणून भुजियाचा खडबडीत, जाड आणि टणक प्रकार बनविला होता. जो बिखी बुवा त्यांच्या भेटीदरम्यान हल्दीराम आणि त्यांच्या भावांसाठी तयार करत. घरातल्या प्रत्येकाला तो मसालेदार, चवदार अल्पोपहार आवडला!

हल्दीराम यांच्या आजोबांचे दुकान होते, हल्दीराम तिथे बिखी बुवांचे भुजिया बनवत. भुजियाच्या विक्रीमधून फक्त काही पैसे मिळत ज्यात हल्दीराम समाधानी नव्हते. तसेच त्यांच्या उत्पादनाची चव व गुणवत्ता त्यांना तितकीशी आवडली नाही.

बीखी बुवाने बनवलेल्या भुजियामध्ये बेसन आणि राजस्थानात उगवलेली मोठ डाळ यांचे मिश्रण होते.

राजस्थानचा भूगोल, विशेषत: मारवाड प्रांताचा, सुपीक जमिनीने संपन्न नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोठ वनस्पती वाळवंटात चांगली उगवते आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.

हल्दीराम यांनी शोधून काढले की जर भुजिया कुरकुरीत असेल तर लोकांना ते खाण्यात मजा येईल. भुजिया बारीक आणि कुरकुरीत बनवण्यासाठी पिठाला आणखी पातळ करण्याची गरज होती. त्यासाठी त्यांना बारीक छिद्रांची जाळी हवी होती. अशी जाळी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी जाळी बनवणाऱ्याचा शोध घेतला आणि त्याच्याकडून ही जाळी बनवून घेतली.

हल्दीराम यांनी आपल्या मोकळ्या वेळेत अनेक ‘भुजिया प्रयोग’ सुरू केले.

ग्राहक दुकानात यायचे आणि खासकरुन ‘हल्दीरामचा भुजिया’ मागायचे.

त्यांच्या काळातील अन्य अल्पवयीन व्यावसायिकांप्रमाणे, अचानक पैसे आल्याने हल्दीरामांनी आपले भान हरविले नाही.

हल्दीराम यांना ग्राहकांना कशाने आनंद होईल हे खरोखर समजून घ्यायचे होते. उत्पादनाच्या गुणवत्तेत कोणत्या मार्गाने सुधारणा करता येईल हे ओळखायचे होते. त्यानंतर त्वरित विक्रीमध्ये विजय समजण्याऐवजी ग्राहकांच्या गरजा भागवून त्यांची निष्ठा मिळविण्यावर भर द्यायचा होता.

ग्राहकांना फक्त सर्वोत्कृष्ट उत्पादने प्रदान करूनच यश मिळवता येऊ शकते, त्यामुळेच त्यांची निष्ठा प्राप्त होते. इतर कोणी काय करीत आहे याकडे दुर्लक्ष करून ग्राहकाला सर्वोत्कृष्ट उत्पादन विक्री करण्याची गरज त्यांना लवकर समजली होती. त्यांच्यासाठी नावीन्य म्हणजे ग्राहकांना आनंदी बनविणे आणि उच्च क्षमता प्राप्त करणे. बाजारपेठेतील इतर प्रतिस्पर्धी काय करत आहेत त्यावर प्रतिक्रिया करण्यापेक्षा.

ब्रँडिंग

जेव्हा ग्राहक उपहार खात तेव्हा त्यांना आपण उपहार खाण्यापेक्षा काहीतरी जास्त केले आहे असे वाटले पाहिजे. ग्राहकांना असे वाटेल पाहिजे की ते प्रमुख आहेत, राजा आहेत. म्हणूनच हल्दीराम यांनी भुजियाला ‘डूंगर सेव’ असे नाव दिले. बीकानेरच्या प्रेमळ महाराजा डूंगरसिंग यांच्या नावावर.

डूंगरसिंग हे (१८७२- ८७) या काळातील एक धैर्यवान आणि आधुनिक महाराजा होते. भारताला पोलिस दलाची ओळख करुन देणारे, राज्याचे पहिले रुग्णालय स्थापन करणारे आणि १८८६ मध्ये बीकानेरमध्ये वीज आणणारे पहिले भारतीय राज्य होते. हल्दीराम यांनी आपल्या भुजियाला डुंगर सेव नाव देऊन इतर प्रतिस्पर्ध्यांपासून वेगळे केले आणि लोकांना ओळखण्यास मदत केली.

भुजियाला राजाचे नाव देऊन त्यांनी ग्राहकांमध्ये स्वाभिमान निर्माण केला. एखादे उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय घेताना ग्राहकांना त्यांच्या सुप्त इच्छांशी जोडण्यासाठी हल्दीरामने नकळत भारतीय स्नॅक फूड उद्योग जगात ब्रँडिंगची सुरवात केली. एका झटक्यात हल्दीराम यांनी दोन काम केले. आपले उत्पादन इतरांपेक्षा वेगळे केले आणि त्याला मूल्य दिले, तर राजाशी जोडून भुजियाला आकांक्षी मूल्यही दिले. आश्चर्यकारक गोष्ट अशी की या किशोरवयीन हल्दीरामने त्याचे सर्व प्रारंभिक यश अगदी कमी औपचारिक शिक्षणासह प्राप्त केले.

नियमित शाळेतील मुलांना २ x २ = ४ सारखे  पाढे शिकविल्या जायचे, तेव्हा मारवाडी मुले दशांश बिंदूंमध्ये पाढे शिकत, जे त्यांना पाठ असत! हा पारंपारिक समाज मानसिक गणितावर जोर देतो. कोणतेही मारवाडी मूल कागदावर पेन्सिल न ठेवता काही सेकंदात २.५ x ३.६ = ९ मोजू शकते. ‘त्यांना गणिताच्या इतक्या युक्त्या शिकवल्या गेल्या की जटिल समस्येची गणना करुन ती योग्य आहे का नाही याचा परत विचार करण्याची त्यांना गरज नव्हती!’

पहिले वितुष्ट

संपूर्ण कुटुंब चार ते पाच खोल्या असलेल्या छोट्या घरात राहत होते. ते किमान तेरा ते चौदा लोक असावेत. जो पहिले येईल त्याला जिथे जागा मिळेल तिथे झोपत असे. वैयक्तिक जागा घेण्यापेक्षा काम करणे नेहमीच महत्त्वाचे होते.

चंपा देवी, हल्दीराम यांच्या पत्नी

पण पुढे हल्दीराम व त्यांच्या भावांच्या बायकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागला आणि पुढे त्यांच्यात वाद निर्माण झाला. हल्दीरामच्या पत्नी चंपा देवी यांनी हल्दीरामचे भाऊ आणि त्यांच्या बायकांसोबत एकाच घरात राहण्यास नकार दिला. चंपा देवीने ७ दिवस अन्नत्याग केला. हल्दीरामची कुटुंबाला सोडण्याची इच्छा नव्हती; परंतु, आपल्या पत्नीला भानावर आणण्यासाठी त्यांनी शेवटी कुटुंब सोडण्याचा निर्णय घेतला. ते घर आणि व्यवसायातून बाहेर पडले. त्यांनी स्वत: साठी कोणतेही पैसे किंवा बचत ठेवली नव्हती. आपल्या नातवंडांना घेऊन त्यांना रस्त्यावर यावे लागले.

अल्लाह

अल्लाह बेली आणि हल्दीराम हे बालपणीचे मित्र होते आणि अनेक वर्ष भेटले नसले तरी जवळचे मित्र होते. अल्लाहने बीकानेरची सीमा पार करून नशीब आजमावण्याचे ठरविले होते तर हल्दीरामने बिकानेर मध्येच राहण्याचे ठरविले होते.

हल्दीरामने अल्लाहला काही वर्षांपूर्वी २०० ₹ उधार दिले होते. अल्लाहला त्याची जाणीव होती. त्याने त्यातील १००₹  हल्दीरामला परत केले. जरी १०० ₹ त्या काळात खूप होते पण ती रक्कम एव्हढीही नव्हती की त्यातून दुकान सुरू करता येईल.

नवीन सुरवात

चंपा देवी यांना मूग डाळ चांगल्या प्रकारे बनविता येत होती. हल्दीरामने फेरीची गाडी सुरू केली. त्यात त्यांना यश मिळाले. कुटुंबाला परत अन्न मिळायला लागले. मूग डाळ हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन होते. भुजिया हे त्यांचे पहिले प्रेम होते.

पुढे त्यांनी एक दुकान मिळविले. दररोज सकाळी २ वाजता पहाटे हल्दीराम आणि त्यांची पत्नी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठत. हल्दीराम परत आला होता — तसेच त्यांचे भुजियाही. ताजा भुजिया विकत घेण्यासाठी त्यांच्या जुन्या ग्राहकांनी दुकानात गर्दी केली. लोक हल्दीरामच्या भुजियाची किती वाट पाहत होते, हे पाहून त्यांना बरे वाटले.

ते आपल्या कुटूंबापासून दूर गेले आणि बिनपैसा रस्त्यावर आले. एकाच वर्षात हल्दीरामने चमत्कारिकपणे घर भाड्याने घेतले, नवीन दुकान सुरू केले आणि आपली जुनी ख्याती पुन्हा मिळविली.

जैन प्रभाव

कट्टर जैन असल्याने हल्दीराम त्यांचे मुख्य जेवण सकाळी १० वाजता करत. सकाळी १० वाजता त्यांच्या समोर थाळी लावलेली नसेल तर ते सकाळचे जेवण सोडून देत आणि सूर्यास्तापूर्वी जेवण करत.

वयाच्या चाळीशीत हल्दीराम दुकानात सकाळी ७ वाजता हजर होत. हिवाळ्यात, सकाळी ७ वाजता, अंधार पडलेला असताना, हवेत धुकं असताना ते दुकानात हजर होत. सकाळी ९ वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद राहत असे. हल्दीराम दुकानात तिथे एकाकी दिवा घेऊन बसत. थंडीने थरथर कापत असताना ही जाणीव असताना की किमान एक दोन तास तरी एकही ग्राहक दिसणार नाही!

हल्दीराम यांचा असा विश्वास होता की त्यांनी आपल्या ग्राहकांना दिलेले वचन पाळले पाहिजे. सकाळी ७ वाजता दुकान सुरू होईल अशी ग्राहकांना खात्री देण्यात आली होती. एखादा ग्राहक तिथे आला व त्याला तेथे कोणीही दिसले नाहीतर. ते दिलेला शब्द पाळत आणि त्याचा त्यांना अभिमान होता. ‘ते ग्राहकांना देव समतुल्य मानत असत. ‘ते नेहमी म्हणायचे, “माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माझे घर आणि पैसे देव देत नाही; माझे ग्राहक देतात. ग्राहकांना त्यांच्या पैशांचा मोबदला भेटला पाहिजे तरच ते परत येतील.”

जरी हल्दीराम अत्यंत तत्त्ववान होते, तरीही त्यांना तंबाखूचे व्यसन होते.

हल्दीराम यांनी पुढे आपला व्यवसाय कोलकाता येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला. हल्दीराम आणि त्यांची मुले ६ वी पेक्षा जास्त शिकलेली नव्हती. तसेच त्यांना इंग्लिश किंवा बंगाली भाषाही येत नव्हती.

कर्ज न घेण्यावर हल्दीराम यांचा ठाम विश्वास होता, म्हणून कोलकाताला जाण्याचा अर्थ होता की कष्टाने मिळवलेल्या कुटूंबाच्या बचतीत नवीन व्यवसाय सुरू करावा लागेल.

मारवडची शक्ती

‘मारवाड़’ हा शब्द संस्कृत शब्द ‘मारुवत’ म्हणजेच ‘वाळवंट’ या शब्दावरुन आला आहे. एखादा मारवाडी जो यशस्वी उद्योजक झाला आहे, त्याने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आपल्या गावातल्या बेरोजगार नातेवाईकांना आणि शेजार्‍यांना त्यात सामील होण्यासाठी निमंत्रण देणे काही असामान्य गोष्ट नाही.

मारवाडी लोकांनी औपचारिक शिक्षणाऐवजी व्यावहारिक ज्ञान, चतुरपणा आणि मानसिक गणितांवर प्रभुत्व कायम ठेवण्यावर भर दिला आहे. कोलकाता, नागपूर आणि दिल्लीच्या संघटनांचे सध्याचे मालक आठवी पेक्षा जास्त शिकलेले नाहीत.

अकबर च्या राज्यात मारवाडी सेठांना त्यांच्या काफल्यांसाठी सशस्त्र संरक्षण आणि शाळा, मंदिरे आणि विहिरी बांधण्यासाठी सनदी देण्यात आल्या होत्या. त्यांना सीमाशुल्क, शोध आणि जप्ती तसेच फौजदारी खटल्यापासून मुक्तता देखील देण्यात आली.

बिकानेरला यशस्वी सुरवात करूनही त्यांनी कोलकाता मध्ये फेरीवाला म्हणूनच सुरवात केली. पुढे जसा त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला त्यांनी दुकान भाड्याने घेतली.

शिव किशन (हल्दीराम यांचे नातू)

शिव किशनजी मध्ये असा गुण होता की ते एखादा अनोळखी पदार्थ जो कसा तयार करतात हे त्यांना माहीत नसतानाही त्यापेक्षाही रुचकर तोच पदार्थ बनवू शकत होते. ते पदार्थांची चव घेऊन त्यात कोण कोणते घटक टाकले आहेत हे सांगू शकत होते.

पुढे हल्दीरामचे दुकान नागपूर आणि दिल्ली येथे कसे सुरू झाले. तसेच भावांमध्ये कसा वाद झाला ? एका भावाला खुनाची शिक्षा कशी झाली ? पुढे हल्दीराम हा ब्रँड कोणत्या भावाला मिळाला ? हे सर्व जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा. पुस्तक खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही विकत घेऊ शकता.

इतर पुस्तकांबद्दल वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमचे लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.