गुंतवणूकदार म्हणजे काय ? गुंतवणूकदार कसे व्हावे ?

गुंतवणूकदार म्हणजे काय ? या आधीच्या लेखामध्ये आपण गुंतवणूक म्हणजे काय ते पाहिले. आता गुंतवणूकदार म्हणजे काय ते पाहूया.

वारेन बफे यांचे गुरु बेन्जामिन ग्राहम यांनी Intelligent Investor हे पुस्तक लिहल आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि, गुंतवणूकदार व्हायला माणसाला फार हुशार असण्याची गरज नाही. तर गुंतवणूकदार व्हायला माणसाला स्वतःच्या जीवनाची जवाबदारी स्वीकारण्याची हिम्मत पाहिजे.

गुंतवणूकदार झाल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. जे लोक ही जवाबदारी घेऊ शकत नाहीत ते गुंतवणूकदार बनू शकत नाही. आपण जे निर्णय घेतो ते कधी चुकतात तर कधी बरोबर येतात. दोन्ही वेळेस आपल्याला आपण जे निर्णय घेतले त्यातून काहीतरी शिकाव लागत. अनेक लोक फार आळशी असतात, नवीन काही शिकणे, वाचणे त्यांना त्रासदायक वाटत. अशा लोकांनी गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांना हे नुकसान झाल्यावर पटेल.

गुंतवणूकदार व्हायला माणसाला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आला पाहिजे. मनावर ताबा कसा मिळवावा ? श्रीमंत होण्यासाठी हे का आवश्यक आहे ?

भीती आणि लालसा ह्या दोन मुख्य भावना आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदार चुकीचे निर्णय घेतात. कदाचित उत्साह इतर क्षेत्रात विजयासाठी आवश्यक असेल, पण गुंतवणुकीमध्ये उत्साह नेहमी संकटाकडे नेतो.

बेन्जामिन ग्राहम बोलले होते, त्यांना आशा आहे की ते जीवनात रोज काहीतरी मूर्खपणा करतील , काही सर्जनशील (creative), उदारपूर्ण काम करतील. कोणीही गुंतवणूकदार किती पण काळजीपूर्वक काम करो त्याच्या हातून चुका ह्या होतीलच. त्यामुळे गुंतवणूकदाराने नेहमी कमीत कमी धोका आणि जास्तीत जास्त परतावा हे तत्व पाळले पाहिजे.

दुसऱ्यांच्या बोलण्यावर फक्त ऐकून विश्वास ठेवणारा माणूस गुंतवणूकदार होऊ शकत नाही. गुंतवणूकदाराचे काम आहे, कोण बोलत आहे ? काय बोलत आहे ? का बोलत आहे ? खर बोलत आहे का ? हे तपासणे.

गुंतवणूकदाराचे काम आहे की स्वतः संशोधन (research) करणे. जो गुंतवणूकदार, गुंतवणूक करण्याआधी स्वतः अभ्यास करत नाही तो फार चुका करतो.

आपण सर्वाना न्यूटन माहितच आहे, ते फार मोठे शास्त्रज्ञ होते. पण ते एक हुशार गुंतवणूकदार होऊ शकले नाही.

त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नव्हती का? होती. पण त्यांच्याकडे गुंतवणूकी करिता लागणारी भावनिक शिस्त नव्हती. त्यांनी शेयर मार्केट मध्ये लोकांच्या गोंधळाकडे लक्ष्य दिले. आपल्या निर्णयाकडे दुर्लक्ष्य करून ते चुकीचे वागले. ते म्हणाले

“स्वर्गातील शरीरांच्या हालचालींची गणना करता येऊ शकते, पण लोकांच्या मूर्खपणाची नाही.”

-न्यूटन

त्यांनी ग्राहमच्या सूचनेकडे दुर्लक्ष्य केले. विकत घेणारा नेहमी कितीला ? हा प्रश्न विचारण्याचे विसरून जातो. गुंतवणूक अशी करा जसे की तुम्ही किराणामाल विकत घेता, परफ्युम नाही. परफ्युम घेताना आपण कितीला ? हे विचारायला विसरून जातो, गुंतवणूक करताना सर्व चांगल दिसतंय म्हणून कोणत्याही भावाला करायची, असे नाही.

पटेल

अमेरिकेत काही वर्षांपूर्वी पटेल लोक नव्हते, पण आज ५० % मोटेल व्यवसाय पटेल लोकांकडे आहेत, त्यांना हे कस जमल ? गुजरात हा भाग आधीपासूनच दुसऱ्या देशातील लोकांशी व्यापार करण्याचे प्रमुख केंद्र आहे. गुजराती लोक हे कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करण्यावर भर देतात. कमी धोका आणि जास्त परतावा हा नियम वापरून व्यवसाय करतात. त्यामुळे आपल्या देशात व जगात गुजराती लोकांना व्यापारात यश मिळत आहे. पटेल लोकांनी यश कसे मिळविले सविस्तर धंधो या पुस्तकात पहा.

गुंतवणूकदार हा नेहमी शिकत असतो.

बफे आधी म्हणत होते कि, त्यांना airline व्यवसाय आवडत नाही. पण आता त्यांनी airline कंपनीचे शेयर विकत घेतले. याचा अर्थ हाच आहे की, गुंतवणूकदाराला शिकत रहाव लागत. परिस्थिती नुसार बदलाव लागत. निर्णय घ्यावे लागतात आणि त्या निर्णयाची जवाबदारी स्वीकारावी लागते. (काही लोकांना बफे कोण हे माहित नसेल, तर बफे हे जगातील क्रमांक २ चे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी आपली सर्व संपत्ती शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करून तयार केली आहे.)

अनेक लोकांना स्वातंत्र्य नको असते, कारण त्यांच्यात परिणामांना स्वीकारण्याच धाडस नसत. म्हणून जीवन जिकडे नेईल व गुलामगिरीत जिथे आपला मालक आपल्याला नेईल तिकडे त्यांना जायचे असते.
वॉरेन बफे बदलल्याचे आपण आणखी एक उदारण पाहू. आधी वॉरेन बफे यांचे म्हणणे होते कि चांगल्या भावामध्ये साधारण कंपनी घ्या. पण त्यांचे मित्र चार्ली मंजर यांच्या सल्ल्याने त्यांनी मग चांगल्या कंपनी साधारण भावामध्ये घेण सुरु केले.

सर्व लोक गुंतवणूकदार नाही बनू शकत.

काही लोक शिकू शकतात, पण सर्वजण नाही, आणि ज्यांना शिकवलं जाऊ शकत त्यांना सर्व काही शिकवलं जाऊ शकत नाही. सर्वात चांगले गुंतवणूकदार पण प्रत्येक वेळी बरोबर नसतात, जसे सचिन प्रत्येक सामन्यात शतक मारत नाही, काही सामन्यात शून्यावर पण बाद होतो. तुम्हाला प्रत्येक वेळी बरोबर असण्याची गरज नाही, तुम्हाला जास्तीत जास्त वेळा बरोबर असण्याची गरज आहे.

गुंतवणूकदाराचा उद्देश असतो कि साधारण पेक्षा जास्त परतावा मिळवणे. त्यासाठी तुमचे विचार इतरांपेक्षा चांगले असले पाहिजे. गुंतवणूकदार हा टेस्ट सामन्याचा फलंदाज आहे. त्याला बाद व्हायचे नाही, रन काढण्याची घाई नाही. ज्या चेंडू वर नक्की षटकार मारता येईल तोच मारायचा. आपल्याला रोज गुंतवणूक कशात करावी हा निर्णय घ्यायची गरज नाही. आपल काम आहे, रोज शिकत राहणे स्वत:ला सुधारत राहणे. आपल ज्ञान कुठे कामात येते का ते पाहणे, आणि मग अशा गुंतवणुकीचा शोध घेण जिथे नक्की षटकार मारता येईल. कमी धोका घेऊन जास्तीत जास्त परतावा मिळेल. प्रत्येक चेंडूवर वर जस बाद होण्याची शक्यता असते, तस आपण किती पण चांगल खेळल तरी काही चेंडूवर आपण बाद होणारच. म्हणून आपल काम आहे, अशे चेंडू ओळखणे ज्यावर नक्की षटकार जाईल. अशी गुंतवणूक ओळखण जिथे नक्की पैसा बनेल.

वारेन बफे यांचे २ नियम आहेत

१. कधीच पैसा गमवू नका.

२. कधीच नियम नं.१ विसरू नका.

वॉरेन बफेटनी त्यांच्या गुंतवणुकीमध्ये पैसे गमावले आहेत. पण त्यांचा हे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही अशा प्रकारे गुंतवणूक करा की जिथे योग्यप्रकारे अभ्यास करून गुंतवणूक केली असेल. पैसे गमविणे हलक्यात घेऊ नका, हा त्यांचा इथे सांगण्याचा उद्देश आहे.

समजा तुमच्याकडे १०० रु आहेत, तुम्हाला ५०% नुकसान झाल तर तुमच्याकडे आता ५० रु राहतील.

आता समजा हेच ५० रु ५०% वाढले तर काय होईल ? ते ७५ होतील, १०० नाही.

कारण ५० ₹ च्या ५०% होतात २५₹.

५०+ २५ = ७५

म्हणजेच जर तुमचे १०० रु ५०% कमी झाले तर ते ५० रु झाले. पण तेच ५० रु ५०% वाढले, तर ते ७५ झाले, १०० नाही.

म्हणून जर तुम्ही तुमचे पैसे गमावले नुकसान झाले, तर तुम्हाला तुम्ही होता तिथेच यायला फार मेहनत घ्याव लागेल. जेवढे % गमावले त्यापेक्षा जास्त % मिळवावे लागतील.

अस का ? तर आधी ते १०० च्या ५० % कमी झाले, आणि नंतर ५० च्या ५०% वाढले.

१०० च्या ५०% होतात ५० आणि ५० च्या ५०% होतात २५. म्हणून कमी होताना ५० ने कमी झाले आणि वाढताना २५ ने वाढले. ५० रु चे १०० तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला ते १०० % ने वाढवावे लागतील.

तर अशी आहे गणिताची मजा. म्हणून साधारण गणित येणे गुंतवणूकदाराला येणे फार आवश्यक आहे.

तुमच्यात वेगळ काय ?

या जगात अनेकांना फटाफट श्रीमंत होण्याची घाई आहे. ९०% लोक तुम्हाला भेटतील जे बोलतील त्यांना लवकर श्रीमंत बनायचं आहे. कदाचित १० % लोक तुम्हाला भेटतील ज्यांना १० वर्षाने श्रीमंत व्हायचं आहे. हीच तुमची मजबूत वाजू आहे. हे ९० % लोक लवकर श्रीमंत होण्याच्या नादात चुकीचे निर्णय घेत जातात. पण संयम असेलेले लोक घाई नसल्यामुळे निर्णय घेताना विचार करतात. मला एक सांगा गुंतवणुकीमध्ये निर्णयच घ्यावे लागतात ना ? तुम्हाला यात शारीरिक श्रम घ्यावे लागतात का ? मांझी ने पहाड फोडला तस हे काम नाही. गुंतवणूक करणे म्हणजे योग्य निर्णय घेणे. विचार करा. नवीन गोष्टी शिकत राहा आणि अशा बिंदूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा जिथे तुमचा निर्णय चूक असण्याची शक्यता फार कमी असेल आणि तुम्ही बरोबर असण्याची शक्यता फार जास्त.

आता तुमच्या मनात प्रश्न येईल जर धोका कमीच करायचा आहे, मग F.D मध्ये गुंतवणूक करतो ना ! फार कमी धोका आहे. तुमच म्हणण बरोबर आहे !धोका फार कमी , पण परतावा पण जवळपास तेवढाच आहे जेवढी महागाई. कोणी F.D करून श्रीमंत झालेला तुम्ही पाहिला आहे का ?

श्रीमंत होणे का आवश्यक आहे ?

मला सांगा श्रीमंत होण का आवश्यक नाही ? आज कित्येक लोक गरिबीमुळे मरतात. तुमच्या मनात नाही येत का ? त्यांना आपण मदत करावी ? स्टेशन वर गरीब लोक पाहून वाटत ना, या लोकांसाठी काहीतरी कराव ? थंडीत उन्हात उघड्यावर झोपणाऱ्या आपल्या देशवासियांबद्दल वाटत ना, यांच्यासाठी काही तरी कराव ? आपल्या सर्वांच्या मनात दुसऱ्याची मदत करण्याची भावना आहेच, मग घोड अडत कुठे ? तर आपल्याकडेच एवढा पैसा नसतो कि आपल्या गरज पूर्ण होतील. मग आपण दुसऱ्यांना काय मदत करणार ? दुसऱ्यांना आपल्याला कपडे देऊ वाटतात. पण आपणच १ वर्ष झाले कपडे घ्यायचे टाळत आहे. मग दुसऱ्याला काय घेणार ? दुसऱ्याला मदत करायला आपण श्रीमंत होणे आवश्यक आहे, आपण गरीब असताना पण मदत करू शकतो, नक्कीच करू शकतो. पण श्रींमंत झाल्यावर आपण अनेकांना मदत करू शकतो. खूप मोठी मदत करू शकतो.

बहुतेक लोक असेच बोलतात कि श्रीमंत झाला कि माणूस खराब होतो, अहंकारी होतो, स्वार्थी होतो. त्याला नको ते शौक लागतात, त्याला झोप येत नाही आणि हास्यास्पद म्हणजे तो income tax ची धाड पडेल याचे स्वप्न त्याला पडतात झोप लागत नाही. तो फक्त पैश्याचाच विचार करतो.

अहंकार – हि भावना कधी येते ? जेव्हा आपण स्वत:ला दुसऱ्याच्या वर समजू लागतो तेव्हा. गरीब लोक जास्त आहेत, श्रीमंत लोक कमी आहेत, म्हणून त्यांच्या मनात हि भावना येते का ? म्हणून ते स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजतात का ? बर फक्त श्रीमंत लोक अहंकारी आहेत का ? जगात फक्त श्रीमंत लोकच अहंकारी आहेत का ? नसेल तर अहंकारी असण्याच कारण दुसर असाव पैसा नाही, अहंकार हि भावना आपण दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ह्यातून जन्माला येते, जात धर्म,रंग,देश यातून पण ती येताना आपल्याला दिसून येते. स्वत:ला इतरापेक्षा श्रेष्ठ समजणार नसाल तर पैसा कमवून तुम्ही अहंकारी होणार नाही.

स्वार्थी – रस्त्यावर इतके अपघात होतात. लोक रस्त्यावर मरतात, त्यांना कोणी मदत करत नाही. मग रस्त्यावर काय सर्व श्रीमंत लोकच असतात का ? म्हणजे श्रीमंत माणूसच स्वार्थी असतो, हे बरोबर आहे का ? श्रींमंत स्वार्थी नसतातच, अस पण माझ म्हणन नाही. माझ म्हणन हेच आहे कि, कोणी स्वार्थी आहे का नाही हा त्याचा स्वभाव आहे. पैसा आला कि आपण स्वार्थी होतो किंवा स्वार्थी असल्याशिवाय तुम्ही श्रीमंत होणार नाही असे लोकांना वाटते. तसे नाही आहे, स्वार्थी असण्याच पैश्याशी काही घेणदेण नाही. एक मात्र नक्की आहे, स्वत:चा विचार आधी केल्याशिवाय तुम्ही श्रीमंत होवू शकणार नाही. स्वत:चा विचार आधी करण म्हणजे स्वार्थीपणा नाही. स्वत:चा आधी विचार करण, आणि स्वार्थी असण्यामध्ये फरक आहे.

शौक– दारू फक्त श्रीमंत लोकच पितात का ? एक माणूस १०,००० कमावतो आणि १०० उडवतो. दुसरा २०० कमावतो आणि १०० उडवतो तर जास्त शौकीन कोण ? ज्या माणसाला जास्त शौक असले तो जास्त काळ श्रीमंत राहूच शकत नाही. कारण त्याचे दायित्व वाढत जातात आणि संपत्ती कमी होत जाते. याउलट मनावर ताबा असेल तरच पैसा तुमच्याजवळ टिकेल शौक करणे हे पैश्यावर अवलंबून नसून, तुमचा तुमच्या मनावर किती ताबा आहे यावर अवलंबून आहे.

पैशांचा विचार– ज्या माणसाने सांसारिक जीवन त्यागले आहे तो सोडून कोण पैश्याचा विचार करत नाही ? आपल्या घरी कोणी बिमार पडल आणि आपल्या कडे त्याला दवाखान्यात न्यायला पैसे नसले तर आपल्याला झोप येणार आहे का ?

लांडग्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकलीच आहे. आंबट द्राक्षे. बहुतेक लोकांना श्रीमंत होण जमत नसल का ते म्हणतात, श्रीमंत होण वाईट आहे आणि आपण श्रीमंत का होवू नये याचे अनेक कारण त्यांच्याकडे असतात.

श्रीमंत अहंकारी, स्वार्थी , शौकीन नसतात असे मला मुळीच म्हणताच नाहीये. माझ म्हणन फक्त एवढच कि ह्या गोष्टी माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतात. पैश्यावर नाही. बिल गेटस, वारेन बफे यासारखे अनेक श्रीमंत लोक आपली ९०% संपत्ती दान करायला निघाले आहेत. त्यांच्या कामामुळे आफ्रिकेत, भारतात अनेक गरीब लोकांना मदत होत आहे. स्वस्त औषध पण जे लोक विकत घेऊ शकत नाही, त्यांना फुकट देऊन कित्येक लोकांचे जीव वाचवत आहेत. आपल्या देशातही अशे अनेक दानशूर आहेत, जे गरिबांच्या कल्याणासाठी खूप पैसा देतात. मग नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत तर आपण एकच का पाहतो ?

तुम्हाला श्रीमंत व्हायचे का नाही व्हायचे ? हे तुम्हीच ठरवा.

पैसा आल्यावर तुम्ही आज आहात त्यापेक्षा जास्त चांगले नाही बनला तर पैसे कमवून पण काय फायदा ? म्हणून श्रीमंत होण्याआधीच ठरावा कि तुम्हाला पैसा का कमवायचा आहे ? फक्त स्वतःच्या हौस मजा पूर्ण करणे हा तुमचा उद्देश असेल, तर लक्ष्यात घ्या इच्छा ह्या अमर्याद असतात. म्हणून श्रीमंत होवून तुमचा प्रश्न सुटणार नाही. पैसा कमवण्याचा उद्देश स्वत:चा आणि इतरांचा उद्धार हा असेल तर श्रीमंत बनून फायदा आहे. नाहीतर पैसा तुम्हाला, जे आहात त्यापेक्षा वाईट बनवेल.

ध्येय

बिना उद्देशाचा गुंतवणूकदार म्हणजे बिना मुक्कामाचा प्रवासी. जर आपण लक्ष्य ठरवलेच नाही, तर तिथे पोहोचणार कसे ? फक्त असे बोललो श्रीमंत व्हायचे आहे त्याने कसे चालेल ?

आपले लक्ष्य SMART असले पाहिजे.

S – SPECIFIC

M – MEASURABLE

A – ACHIEVABLE

R – RELEVANT

T – TIME BOUND

SPECIFIC- म्हणजे मला माझ्या म्हातारपण साठी १ करोड जमा करायचे आहेत.

MEASURABLE– म्हणजे कि त्यासाठी मला दरवर्षी किती गुंतवणूक करायची आहे. दरवषी मला किती जमा करावे लागतील ? मी किती करतोय ?

ACHIEVABLE– म्हणजे असा ध्येय जे पूर्ण होवू शकल पाहिजे. मी एका दिवसात करोडपती होईल, असा विचार केला तर हे मिळवण तुम्हाला जमेल का ?

RELEVANT- तुम्ही जे उद्दिष्ठ ठरवलं ते तुमच्या जीवनाच्या मूल्यांशी समांतर असाल पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला फिरायला जायला आवडत नाही तर उगाच विदेश यात्रेसाठी गुंतवणे, कार विकत घेणे. दुसऱ्यांवर छाप पाडायला नको ते ध्येय निवडणे.

TIME BOUND- म्हणजे या उद्धीष्टासाठी तुम्ही काय कालमर्यादा ठरवली आहे ? किती वेळात तुम्ही हे तुमचे उद्धिष्ट गाठणार आहात ?

हे करताना तुम्हाला महागाई चा विचार करावा लागेल. तुमच्या उद्दीष्टांनुसार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करू शकता? जीवनात कोणती आर्थिक उद्दीष्टये असतात ? हे तुम्ही इथे पाहू शकता.

गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा मिळायला लोक फार धोका घेतात, मग आपली झोप गमावून बसतात.

“4 प्रकारच्या संपत्ती आहेत:

१. आर्थिक संपत्ती (पैसा)
२. सामाजिक संपत्ती (दर्जा)
३. वेळ संपत्ती (स्वातंत्र्य)
४. भौतिक संपत्ती (आरोग्य)

अशा नोकऱ्यांपासून सावध रहा ज्या १ आणि २ कडे आकर्षित करतात, परंतु ३ आणि ४ लुटून घेतात.”

– James Clear

“एक चांगला गुंतवणूकदार बनण्यासाठी आवश्यक असलेल्या ४ गोष्टी:

-बुद्धिमत्ता

-शिस्त

– धैर्य

-भांडवल

यापैकी काहीही रात्रीतून विकसित होत नाही. शाश्वत वाढीस वेळ लागतो.”

– Wealth Theory

गुंतवणुकदाराची शपथ

मी ——- , मला श्रीमंत व्हायचे आहे आणि फक्त श्रीमंत व्हायचे नसून संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवायची आहे.

मला माहित आहे असे अनेक क्षण येतील, जेव्हा लोकांमध्ये भीती आणि लालसा हावी होईल. लोक भावनेने निर्णय घेतील, पण मी असे करणार नाही. मी नियमितपणे गुंतवणूक करत राहील. मी गुंतवणूक करण्याआधी जेवढ होऊ शकेल तेवढ संशोधन करेल. गुंतवणूक केल्यावर वेळोवेळी निरीक्षण करेल.

मी गुंतवणूक करताना कमी धोका जास्त परतावा या तत्वाच पालन करेल. याकरिता मी त्याच जागी गुंतवणूक करेल ज्याचे मला चांगले ज्ञान आहे.

माझा विचार अशा जागी गुंतवणूक करण्याचा आहे, ज्यात माझी गुंतवणूक मी जन्मभर ठेऊ शकतो. १ दिवस, १ महिना, १ वर्ष गुंतवणूक करण्यापेक्षा माझ लक्ष्य कमीत कमी १० वर्षांकरिता गुंतवणूक करण्यावर राहील.

ह्या शपथेची प्रत मी माझ्या जवळच्या कमीत कमी एका तरी व्यक्तीला सही करून देईल.

नाव –

सही –

दि

गुंतवणूकदाराची शपथ download करण्यासाठी क्लिक करा

गुंतवणूकदाराची सर्वात मोठी समस्या आणि त्याचा सर्वात वाईट शत्रू तो स्वत:च आहे. गुंतवणूक लवकर सुरु करा, संपत्ती निर्माण करणे हे झाड लावणे सारखे आहे.

हा लेख लिहिताना मी वाचलेली काही पुस्तके, जी तुम्ही पण वाचू शकता. विकत घेण्यासाठी पुस्तकावर क्लिक करा.

1.

२.

3.

इतर लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला इथे भेट देऊ शकता.

24 thoughts on “गुंतवणूकदार म्हणजे काय ? गुंतवणूकदार कसे व्हावे ?”

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.