मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ?
मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ?
आज अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न खदखदतोय. आज या विषयाबद्दल आपण सविस्तर बोलू. जर कुठला मुद्दा राहिला असेल तर कमेंट करून कळवा. आपण तो जोडण्याचा प्रयत्न करू. तर लेख मी खालील प्रमाणे लिहिला आहे.
१. समस्येचे कारण काय ?
२. खरी समस्या काय ?
३. समस्येवर उपाय काय ?
४. उपायांच्या समस्या काय ?
५. आणि त्या समस्यांचे उपाय काय ?
समस्या
आज बहुतांश तरुण आपल्या नोकरीमध्ये असमाधानी का आहेत ?
आपला देश विकसनशील असल्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यामागे पैसा हे मुख्य कारण असते. आपल्या देशातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे संसाधने फार कमी आहेत. आजपासून काही दशकां आधी समाजात सन्मानजनक आणि भरपूर पैसा देणारे फक्त थोडेच काम होते. जसे की डॉक्टर आणि इंजिनिअर. काही दशकां आधी कोणत्याही पालकाला असे वाटत होते की, माझ्या मुलाने एक तर डॉक्टर व्हावे किंवा इंजिनियर. हे दोन्ही बनण्यासाठी उच्चशिक्षित होणे आवश्यक होते. त्यामुळेच आपला पालक वर्ग सतत आपल्या मागे अभ्यास कर, अभ्यास कर करायचा.
त्यामुळे काही वर्षांआधी आपण कोणते काम केले पाहिजे, हे आपल्या दहावीच्या टक्क्यांवर ठरत असे.
७०% सायन्स
६०% कॉमर्स
५०% आर्ट्स.
व्यवसाय करणारे लोकही त्या काळी होते. मग आपल्या पालकांनी आपण व्यावसायिक व्हावं असं स्वप्न का नाही पाहिलं ? कारण व्यवसाय करायला पैसा लागतो जो त्यांच्याकडे नव्हता. तसेच व्यवसाय कसा करावा ? हे देखील त्यांना माहीत नव्हते. मग ते कसे सांगतील की व्यवसाय करा. तसेच ते आपलेच पालक आहेत ना, त्यांनी सोपा उपाय शोधला. “शाळेत जा, अभ्यास कर, मोठा हो.” बस यशाचे हेच एक सूत्र त्यांना माहीत होतं. त्यात त्यांनी सगळे तुमच्यावर ढकलून दिले. त्यामुळे आपण सर्व मार्क्सच्या शर्यतीत लागलो, नोकरी मिळविण्याच्या.
नोकरी सोडून दुसरं काही विचार करणाऱ्यांना तर समाजात विचित्र प्राणी म्हणून पाहिल्या जायचे. मग आपण हवं ते न करता, मिळेल ते करत गेलो. फक्त पैसा कुठे जास्त आहे हा विचार करत. त्यामुळेच बरेच लोक इच्छा नसतानाही नोकरी करतात. अशा जागी नोकरी करतात जिथे त्यांची काहीच इच्छा नाही आहे. त्यामुळे त्यांच्या मनात हा असंतोष आहे. जे इंजिनियर आज बँकेत नोकरी करतात त्यांचे तरी एक वेळ समजू शकतो. पण जे चपराशी म्हणून काम करण्यास तयार आहेत, ते १० वर्षांनी त्यांच्या कामात समाधानी राहतील का ?
पण आता ही परिस्थिती हळूहळू बदलतेय. आपल्या पिढीमध्ये बदलायला लागली आहे. आपण आपल्या मुलांना क्रीडाक्षेत्र, व्यवसाय व इतर गोष्टींमध्ये प्रोत्साहित करीत आहोत.
खरी समस्या काय ?
मग सर्वच ज्यांना नोकरी सोडू वाटत त्यांना व्यवसाय करायचा आहे की काही वेगळ कारण आहे ?
बऱ्याच जणांना तर व्यवसाय करायची इच्छा नसते, पण ते नोकरी मध्ये झालेला अत्याचार सहन करू शकत नाहीत. म्हणून मग व्यवसाय त्यांना स्वर्ग वाटू लागतो. त्यामुळे त्यांना वाटत व्यवसाय करावा. अशांनी नोकरीच केली पाहिजे, फक्त दुसरी.
ज्यांना व्यवसाय हा स्वर्ग वाटतो त्यांनी आपल्या व्यवसाय करणाऱ्या मित्रांना, “त्यांना काय त्रास आहे ?”, हे विचारावे. समजा तुम्ही एका व्यवसायाचे मालक आहात. तुमचा कर्मचारीही तुम्ही वाचताय तसा लेख वाचत असेल, “नोकरी सोडून व्यवसाय करू का ?” तेव्हा तुम्हाला वाटेल मी या व्यक्तीसाठी एवढे केले आणि हा माझी नोकरी सोडून चाललाय.
फक्त तुमच्या मालकाच्या भावनांचा विचार करा, असे माझे म्हणणे नाही. तर तुमच्या मालकाच्या फक्त श्रीमंतीकडे पाहू नका. त्याच्या समस्यांकडे सुद्धा पहा. तुम्ही त्या समस्या हाताळण्यास तयार आहात का ? तुमचा मालक ज्या समस्या सोडवतो त्याचे बक्षीस म्हणून त्याला पैसा मिळतो. बरेच जण स्वतःचीच समस्या सोडवू शकत नाहीत. त्यांना इतरांची समस्या सोडवणे जमेल का ? जमुही शकत. माझं काम फक्त तुम्हाला दुसरा दृष्टिकोन मांडणे आहे. माझे काम तुम्हाला नकारत्मक बनवणे नाही तर तार्किक बनवणे आहे. कोणाचेही जीवन हवे असेल तर ते तेव्हाच घ्या जेव्हा तुम्ही ते पूर्ण २४ तास जगू शकता, फक्त चांगला वेळ नाही.
कारण आज लाट आली आहे व्यवसाय करतो म्हणणाऱ्यांची. “व्यवसाय सोडून नोकरी करा, असे सांगणारे पण नको का ? त्यांची खरंच गरज नाही का ? सर्वच लोक व्यवसाय करू शकतात का ?” लाटेत वाहून जाऊ नका. लाटेत वाहून जाणारे डुबतात. अनेकांना वाटत व्यवसाय म्हणजे पटकन श्रीमंत होण्याची किल्ली. त्यात मदत करायला अनेक motivational विडिओ आणि पेज आहेतच की. काही दिवसां अगोदर एका मुलाचा लेख वाचला पेपर ला, demotivational करणार पण कोणी हवं. त्याने त्याची व्यथा मांडली कसे गावातील लोक शेती विकून स्पर्धा परीक्षांच्या मागे लागलेत. तीच व्यथा आज व्यवसायाची झाली आहे.
जो तो आज पटकन श्रीमंत कसा होईल, हाच विचार करतो. १० वर्षांनी कसा होईल ? हा नाही. जेफ बेझोस ने वॉरेन बफे ला विचारले, “तुमची श्रीमंत होण्याची पद्धत एवढी सोपी आहे, मग लोक तुमची नक्कल का नाही करत ?” वॉरेन बफे ने उत्तर दिलं, “कारण लोकांना पटकन श्रीमंत व्हायचं असतं.”
आपण जोपर्यंत खरी समस्या ओळखणार नाही, तोपर्यंत आपण परिस्थिती सुधारू शकणार नाही. कदाचित तुम्हाला व्यवसाय नाही तर दुसरी नोकरी करण्याची गरज आहे. तुम्ही सध्याच्या नोकरीमध्ये असमाधानी आहात, याचा हा अर्थ नाही की सर्वच नोकरीमध्ये तुम्ही असमाधानी राहाल.
तुमच्या असमाधानाच खरं कारण काय आहे ?
ते काम करणे तुम्हाला आवडत नाही का ?
तुम्हाला त्यात योग्य पैसे मिळत नाहीत ?
त्यामध्ये तुम्हाला योग्य सन्मान मिळत नाही का ?
हे काम तुम्हाला हीन वाटतं का ?
ह्या कामात तुम्हाला चांगले भविष्य वाटत नाही ?
खऱ्या समस्या पर्यंत पोहोचा. व्यवसाय हे सर्व समस्यांना उत्तर नाही. काही असेही असतील ज्यांना काहीच काम नको, फक्त पैसा हवा. खरी समस्या जाणून घ्या, मग उपाय शोधा. जो व्यक्ती कुठेच नोकरी करू इच्छित नाही, मग त्याला बेरोजगारी वा व्यवसाय हाच पर्याय उरतो. म्हणजे तुम्ही आधी नोकरी शोधा आणि मगच व्यवसायात या, असे माझे म्हणणे नाही. सध्या आपण अशा लोकांबद्दल बोलतोय ज्यांच्या मनात प्रश्न आहे मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ?
“कला क्षेत्रात करिअर करण्याचे एकमेव चांगले कारण म्हणजे आपण दुसरे काहीही करण्याची कल्पना करू शकत नाही.”
– Srinivas Rao
व्यवसायाच्या बाबतीतही मला हे खर वाटत, जर दुसरं कुठलंच काम करण्याची तुमची इच्छा नसेल तरच व्यवसाय करा.
थोडक्यात समस्या काय ?
आपण असे काम करणे जिथे काम करण्याची आपली इच्छा नाही. पण हेच एक कारण नाही. काही लोकांना खरंच श्रीमंत व्हायचे आहे. काहींना फार त्रास आहे ‘बॉस’ चा किंवा इतर काही व्यक्तिगत कारण.
मग या समस्येवर उपाय काय ?
असमाधानी जागा सोडून समाधानी जागी जाणे, हे झालं सोपं उत्तर. नोकरी सोडा व्यवसाय करा, हे झालं सोपं उत्तर. पण त्याने समस्या सुटेल का ?
उपायांच्या समस्या काय ?
नोकरी सोडली तर उपाशी मरू का ?
नाही बाबा, कशाला उपाशी मरतो ? आपलं कसा आहे ना आपण यशस्वी माणसाला पाहतो आणि आपली इच्छा होते, उद्या सकाळी उठलो ना कि या माणसा सारखाच बनून उठेल. असं काही नसतं यश मिळवणे आणि टिकवणे दोन्ही सोपं नसतं.
यश मिळताना त्या माणसाला लागलेला वेळ आपण विसरतो. काही लोक लवकर यशस्वी झालेही आहेत. असतील ते भाग्यवान किंवा तुमच्या पेक्षा हुशार. बरं तुम्ही हे दोन्ही नाही समजा. तरी मग तुम्हाला यशस्वी व्हायचं मग आता काय ?
व्यक्ती कमी वेळात एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी झाला, की आपण लगेच त्याच्याशी तुलना करायला लागतो. मी स्वतःही असा विचार करतो. Xyz पेज १ वर्षात १लाख like पर्यंत पोहोचले. पण आपण अजूनही इथेच ? मग आपणही तसेच झालो पाहिजे.
सचिन १६ व्या वर्षी क्रिकेटमध्ये आला, मी तर २५/ ३०/ ३५ वर्षाचा अजुन कुठेच नाही. अशा वेळी आपण हे विसरतो की Matthew Hayden सुद्धा २३ व्या वर्षी क्रिकेट मध्ये आला. पण त्याला यश २९ व्या वर्षी मिळाले. दुसरे किती वेळात यशस्वी झाले ते सोडून द्या. तुम्ही त्यांच्या कोणत्या सवयी लावू शकता ? त्या लावून घ्या. कारण चांगल्या सवयी लावल्या तर फायदा आज ना उद्या होईलच.
ब्रुसली ने म्हटलंच आहे, “इतरांमध्ये जे चांगले आहे ते घ्या. जे खराब आहे ते सोडून द्या आणि तुमचं स्वतःचं काहीतरी जोडा.” जॅकी चॅन कडे पहा त्यांनी Martial Art मध्ये हास्य जोडले, फाईट आणि कॉमेडी.
तुम्ही उपाशी मरणार असाल तर कशाला नोकरी सोडता सर सलामत तो पगडी पचास.
मग नोकरी कधी सोडावी ?
कधी नोकरी सोडावी = (x + y) / 147
मित्रांनो जीवन एवढे सोपे नाही की मी तुम्हाला एक सूत्र देईल.
नोकरी सोडताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करावा ? हे मी सांगू शकतो. आपलं घर चाललं पाहिजे. नोकरी सोडल्यावर आपलं घर चाललं पाहिजे, तेवढा पैसा आपल्याकडे असावा.
आता किती दिवस पुरणारा पैसा हवा ?
तेवढा काळ जेवढा तुम्हाला वाटत की माझा व्यवसाय उभा राहायला वेळ लागेल. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल कि माझा व्यवसाय उभा राहायला दोन वर्षे लागतील. तर दोन वर्षे पैसा पुरेल एवढा. आता काही मित्र म्हणतील भाऊ जर दोन वर्षे पुरेल एवढा पैसा असता तर नोकरी का सोडली असती ? त्यातच खुश असतो ना. तेच तर मला म्हणायचे आहे. “मित्रांनो बर्याच लोकांची खरी समस्या पैशांची कमतरता आहे, नोकरी किंवा व्यवसाय नाही.”
पण आपला हा गोड गैरसमज आहे विशेषतः नोकरी करणाऱ्यांचा. व्यवसाय म्हणजे स्वातंत्र्य आणि चिक्कार पैसा. हे सत्य आहे पण ते सर्व व्यवसायांसाठी नाही. “व्यवसाय हा स्वर्ग आहे, तिथे पोहचलो की बस आनंदाच्या समुद्रात येथेच्छ पोहत राहील,” हा विचार मनातून काढून टाका. सर्वांमध्ये व्यवसाय करण्याची क्षमता नसते. तुमच्या मध्ये आहे का ? याचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच द्यायचे आहे. दुसऱ्याचे उत्तर तुमच्या काही कामाचे नाही.
आपण आधी त्या लोकांबद्दल बोलू ज्यांच्याकडे पैसा आहे पण हिम्मत नाही.
मित्रांनो सध्याची नोकरी सोडून जो व्यवसाय करायचा आहे, त्या क्षेत्रात तुम्ही नोकरी करू शकता. किंवा त्या क्षेत्रात छोटा मॉडेल प्रयोग तुम्ही करू शकता. एकदमच पूर्ण पैसे वगैरे लावून उभा करण्यात काही अर्थ नाही. आता जर तुमच्या मनात प्रश्न आहे कोणता व्यवसाय करावा ? तुम्ही ह्या लींक वर जा. पुढे खाली वाचू नका. तुमची समस्या संपली.
आता ज्या मित्रांकडे पैसे नाहीत.
नोकरी सोडून व्यवसाय करणे फार धोकादायक आहे. कारण यात ९० टक्के लोक अपयशी होतात. जिंकण्याची शक्यता कमी आहे. पण तुम्ही कुठेच नोकरी करू शकत नाही तर जा पुढे तुम्हाला पर्याय नाही.
पण समस्या त्या लोकांची आहे, जे द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. ज्यांचे लग्न झाले मुलंबाळं आहेत. व्यवसाय करण्याची खरोखरच इच्छाआहे, पण पैसा नाही.
सर्व व्यवसाय मोठे होत नाहीत.
जर तुमच्या पगाराएवढे उत्पन्न मिळणारा व्यवसाय तुम्ही करणार असाल आणि त्यात पुढे काही प्रगती होणार नसेल तर काय फायदा ? आपण व्यवसाय सुरू करताना ॲमेझॉन, गुगल होऊ असा विचार करून सुरुवात करतो. २०,००० दरमहा कमवेल हा विचार करून नाही.
आता यात बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मी कर्ज काढतो.
या गोष्टीच्या विरोधात मी आहे आणि या गोष्टीबद्दल माझ्या पेजवर माझी बरीच टीका केली जाते. व्यवसाय हा कर्ज काढूनच केला पाहिजे, ही बर्याच लोकांची मानसिकता आहे. पैसा असणे आणि श्रीमंत असणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमची संपत्ती तुमच्यावरील कर्ज वजा करून ठरवली जाते, ते पकडून नाही.
तुमच्याकडे कार, घर सर्व आहे. पण कर्जावर मग ते तुमच आहे का ? आर्थिक स्वातंत्र्य असणारा व्यक्ती हा कधीही काम करणे थांबवून बाकी जीवन आरामात जगू शकतो. पण कर्ज असलेला व्यक्ती काम करणे थांबवू शकतो का ? EMI नाही भरली तर काय होईल ? ज्या गोष्टीमध्ये फक्त दहा टक्के शक्यता असेल जिंकण्याची, तिथे तुम्ही कर्ज काढून सुरुवात करणे शहाणपण वाटतं का ? काही लोक होतीलही यशस्वी कर्ज घेऊन. प्रश्न हा आहे की तुम्ही होणार का ? तुम्हाला उत्तर हो मिळत असेल तर जा पुढे आणि काढा कर्ज. तसेही तुम्ही कुठे ऐकणार आहात ? कारण जिंकणारे आणि हरणारे दोघेही वेडे असतात, ते कोणाचं ऐकत नाहीत.
आता उरल्या त्या लोकांचा प्रश्न ज्यांना कर्ज काढायचे नाही.
मित्रांनो Jia Jiang यांनी सहा महिने नोकरी सोडून त्यांना जे काही आवडतं ते करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही देखील हा प्रयत्न करू शकता. त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. कदाचित तुमचा होणार नाही. पण प्रयत्न केल्याचे समाधान मिळेल. सहा महिने एवढा वेळ तर तुम्ही तुमचे जीवन बदलायला नक्कीच देऊ शकता ना ? तुम्हीच ठरवा.
सहा महिने एवढा मोठा कालावधी नाही की व्यवसाय उभा राहील पण तुम्हाला काही अंदाज तर येईल. त्यानंतर ठरवा पुढे काय करायचं. सहा महिने तुम्ही नोकरी सोडली तरी दुसरी नोकरी मिळवणे जास्त कठीण नाही. म्हणजे परत जाण्याचा मार्ग खुला आहे. Jia Jiang ची कथा तुम्ही इथे वाचू शकता.
लक्षात घ्या मित्रांनो हा सल्ला त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्यावर घराची जबाबदारी आहे. जे एकटे आहेत किंवा वेडे आहेत त्यांच्यासाठी नाही. त्यांच्यासाठी एक वेगळा लेख लिहावा लागेल.
मी नोकरी सोडून व्यवसाय करू का ? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे, तुमचे आणखी मुद्दे असतील तर कमेंट मध्ये सांगा.
आमचे इतर लेख इथे वाचू शकता.
आमचे फेसबुक पेजला इथे भेट देऊ शकता.
khup chaan…
धन्यवाद, फेसबुक पेज like करा. http://www.facebook.com/guntavnukdar
धन्यवाद. आमचे फेसबुक पेज पहा http://www.facebook.com/guntavnukdar
तसेच Youtube channel https://www.youtube.com/channel/UCbcIsJD_H_oUWJFtEMfdTmA
मला Pathological Lab consumable material चा व्यावसाय करायचा आहे.मला marketing चा अनुभव नाहि आहे.मला व्यवसाया बद्दल मार्गदशन पाहिजेआहे.मला ४० हजार पगार होतो.मला कामावरुन काढले आहे मला व्यवसाय करायचा आहे.
Hi
बोला