पैशाची बचत कशी करावी

पैशाची बचत कशी करावी हे जाणण्यास बरेच लोक उत्सुक असतात.

पैशाची बचत कशी करावी

बचत कशी करावी असे म्हटल्यावर लगेच वॉरेन बफेट यांचा विचार मनात येतो.

“आधी बचत करा मग खर्च.”

– वॉरेन बफेट

बचतीबद्दल हा सर्वात उत्तम सल्ला आहे. तुम्ही आधी बचत नाही केली तर खर्च केल्यावर बचत करण्यासाठी काहीच उरणार नाही.

रॉबर्ट कियोसाकी यांनी देखील रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात उपाय सुचवला होता

आधी स्वतःला पैसे द्या मग इतरांना

रॉबर्ट कियोसाकी

खर्च अमर्याद असतात.

इच्छा अमर्याद असतात आणि त्यामुळेच खर्च. जितका पैसा असेल तितक्या तुमच्या इच्छा असतील त्यामुळेच आधी बचत केली पाहिजे आणि नंतर खर्च. नाहीतर सर्व पैसे खर्चात संपून जातील आणि बचत करण्यास काहीच उरणार नाही.

“कमी गरजा, जास्त स्वातंत्र्य.”

बेरीज नाही वजाबाकी

आपल्याला असे वाटते की जोडल्यामुळेच जीवनात सुधारणा होते.

नवीन घर आपले जीवन अधिक चांगले करेल. नवीन मित्र उत्साह वाढवेल. एक नवीन कार मला अधिक सुखी करेल. एक नवीन कल्पना आपल्याला हुशार करेल.

बेरजेऐवजी वजाबाकीचा प्रयत्न करा.

तुमच्या जीवनातून नकारात्मक संबंध काढा. एक सदस्यता (Subscription) रद्द करा. तुम्हाला मागे धरुन असलेली मानसिकता सोडून द्या.

गोष्टी जोडणे थांबवा आणि जे आपल्याला मागे ओढत आहे ते काढणे सुरू करा.

हा सिद्धांत Shane Parrish यांच्याकडून घेतला आहे.

बचत किती करावी ?

कमीत कमी १०%. लक्ष्यात ठेवा ही रक्कम कमीत कमी म्हटलेली आहे, जास्तीत जास्त नाही. अनेक लोक फक्त १०% च बचत करण्याचं ध्येय ठेवतात, हे साफ चूक आहे. तुम्ही १०% पेक्षा जितकी जास्त बचत करू शकता तेवढे चांगले. पण कोणत्याही परिस्थितीत किमान १०% तरी बचत करा. मग तुमचे वय १८ असो किंवा ८०.

उलट तुमचे वय कमी असेल तर जास्त बचत करा. कारण तरुणांवर जवाबदाऱ्या कमी असतात आणि करावाच लागेल असे खर्च फार कमी असतात. त्यांच्या मागे EMI, मुलांच्या शाळेची फी किंवा साथीदाराचे खर्च नसतात. ८० वयाच्या व्यक्तींनीही बचत करावी, कारण कोण किती जगेल हे कोणालाच माहीत नसते. तुम्ही १०० वर्ष जगलात तर ? आणि नाहीच तर निदान इतरांसाठी तुम्ही ती बचत सोडून जाऊ शकता. भूक नसो पण शिदोरी असो.

बचत करणे पुरेसे आहे का ?

नाही. बचत करणे पुरेसे नाही. गुंतवणूक करणे आवश्यक आहे. बचत आणि गुंतवणूक मध्ये फरक काय ? बचत म्हणजे पैसे वाचवणे आणि गुंतवणूक म्हणजे वाचवलेले पैसे अशा जागी लावणे जिथे ते वाढतील. कोणत्या गतीने ? महागाईच्या पेक्षा जास्त गतीने.

तसेच विमा असणेही आवश्यक आहे. विमा हे हेल्मेट आहे समजा. जसे अपघात झाल्याशिवाय हेल्मेटचे महत्त्व कळत नाही, तसेच काही वाईट घडल्याशिवाय विम्याचे महत्त्व कळत नाही. म्हणून आरोग्य विमा, टर्म इन्सुरन्स आणि गुंतवणूक ह्या ३ गोष्टी नक्कीच असू द्या. या पुढे जाऊन तुम्ही घराचा विमाही काढू शकता.

बचत करण्याचे मार्ग कोणते ?

बचत स्वयंचलित करा.

जेव्हा तुम्ही स्वतः बचत करण्याचे ठरवता तेव्हा प्रत्येक वेळेस हा निर्णय घेणे बचत करावी का नाही ? कठीण काम होते. अशा बऱ्याच परिस्थिती असतात जेव्हा इतर काम जास्त महत्वाचे वाटतात बचतीपेक्षा. म्हणून बचत स्वयंचलित करा. जर पगारदार असाल तर पगाराच्या दिवसानंतरच SIP ची तारीख ठेवा. म्हणजे आधी बचत होईल मग खर्च. SIP काय आहे हे माहीत नसेल तर म्युच्युअल फंड म्हणजे काय हा आमचा लेख वाचा. व्यावसायिक असाल तर एकदम मिळणारी रक्कम म्युच्युअल फंड च्या liquid फंड किंवा इतर डेट फंड मध्ये टाकू शकता.

क्रेडिट कार्ड म्हणजे आपत्कालीन कार्ड समजा.

जर तुमचा स्वतःवर ताबा नसेल तर एक काम करा. तुमचे क्रेडिट कार्ड घरीच ठेवा. यावर तर एका पुस्तकात मी एक जालीम उपाय वाचला होता की तुमचे क्रेडिट कार्ड फ्रीज मध्ये पाण्यात गोठवून ठेवा. जेणेकरून ते विरघळे पर्यंत तुमची ती वस्तू घेण्याची इच्छा मरून जाईल. EMI मुळे बऱ्याच गोष्टी आपण ज्या टाळू शकतो, त्याही विकत घेतो म्हणून क्रेडिट कार्ड टाळा. बचत करण्यासाठी क्रेडिट कार्ड टाळणे फार आवश्यक आहे.

क्रेडिट कार्ड ला ATM कार्ड सारखे वापरू नका. आणि क्रेडिट कार्ड च्या मर्यादेला तुमचे उत्पन्न समजण्याची चूक करू नका. क्रेडिट कार्ड स्वतःवर ताबा नसेल तर फक्त आपत्कालीन परिस्थिती मध्ये वापरा. स्वतःवर ताबा आहे का नाही कसे समजावे ? जर वस्तू खरेदी करून नंतर पश्चाताप होत असेल, बचत होत नसेल तर समजावे स्वतःवर ताबा नाही.

नोंद ठेवा.

कुठे पैसे खर्च होतात हे माहीतच नसेल तर बचत होईल कशी ? अनेक मोफत अँप उपलब्ध आहेत जिथे तुम्ही हे काम करू शकता. मी Expense Manager हे अँप वापरतो. हे फारच उत्तम अँप आहे. यात होणारे उत्पन्न आणि प्रत्येक खर्चाची नोंद करा. प्रत्येक खर्चाची नोंद करा, तरच या अँप चा फायदा आहे. १ ₹ खर्चाची नोंद देखील मी अँप मध्ये ठेवतो. हे अँप वापरल्यापासून मला माझा खर्च कुठे जास्त होतोय हे कळले. आणि त्यामुळे हा खर्च कसा कमी केला जाऊ शकतो ह्याचा मी विचार करू शकलो.

जे मोजल्या जाते ते सुधारल्या जाते. 

Claude Whitacre

न मोजता सुधारणा करणे शक्य नाही. मोजल्यावरच तुम्हाला कळते कुठे बदल करणे आवश्यक आहे. मोजल्यामुळे तुम्हाला काय, कुठे बदल करावा हा अभिप्राय मिळतो.

Data Is New Oil. म्हणजे डेटा हे नवीन तेल आहे. तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल हा अर्थ इथे आहे. आधीच्या काळात जे महत्त्व पेट्रोल ला होते, तेच महत्त्व आता डेटा ला आहे. डेटा वरून तुम्ही कुठे सुधार घडवायचा आहे, हे ठरवू शकता.

कॅशबॅक / ऑफर्स

ऑफर्स आहेत, कॅशबॅक मिळणार आहे, म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करू नका. तर आधी काय खरेदी करायचे आहे हे ठरवा आणि नंतर त्यावस्तूवर कसा जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवता येईल हे पहा.

दोन बाजारात गेल्याशिवाय तुम्हाला वस्तूची किंमत कळणार नाही.

आफ्रिकन म्हण

कोणतीही वस्तू खरेदी करताना दोन बाजार नाही तर निदान दोन दुकानात तरी चौकशी करा. त्यामुळे तुम्हाला कुठे काय वस्तू स्वस्त मिळते हे कळेल. होलसेल मार्केटला खरेदी करण्याचा प्रयत्न करा, तिथे तुम्हाला सहसा घराजवळील दुकानापेक्षा स्वस्तात सामान मिळेल. स्वतःवर चांगला ताबा असेल तर UPI payment चा वापर करून कॅशबॅक मिळवू शकता. अन्यथा कॅश (रोख) चा वापर करा. कारण कॅश वापरताना आपण खर्च कमी करतो.

म्हणतात ना

A Penny Saved Is A Penny Earned.

म्हणजे १₹ वाचवणे हे १₹ कमावण्या समान आहे.

खालील अँप्स चा वापर करून मी खूप वेळा कॅशबॅक मिळविला आहे. तुम्हीही ते अँप्स वापरून पैसे कमवू शकता.

PhonePe

GPay

Mobikwik

Paytm

सेकंड हँड

प्रत्येक गोष्ट सेकंड हँड घेतलीच पाहिजे असे नाही. इलेक्ट्रॉनिक गोष्टी नवीन घेणेच योग्य कारण त्यात आत काय खराबी आहे हे सहसा आपण जाणू शकत नाही. पण इतर काही वस्तू जसे की फर्निचर इतर भौतिक गोष्टी ज्यात आत काही तंत्रज्ञान नाही किंवा फार सोपे तंत्रज्ञान आहे, अशा गोष्टी ज्यांना जास्त मेंटेनन्स नाही, तुम्ही सेकंड हँड घेऊ शकता. यासाठी तुम्ही Olx.in सारख्या साईट चा वापर करू शकता.

तुम्हाला आवश्यक नसलेल्या गोष्टीही ह्यावर विकू शकता आणि पैसे निर्माण करू शकता. ही साईट वापरताना सहसा समोरासमोर व्यवहार करा, जेणेकरून ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यता कमी असेल.

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही UPI मध्ये PIN टाकता तेव्हा पैसे तुमच्या खात्यामधून दुसऱ्याच्या खात्यात जातात.

आपत्कालीन निधी

“Insurance & Emergency Fund Are Better Than Personal Loan.”

आपत्कालीन निधी नसेल तर emergency मध्ये कर्ज काढावे लागेल. कर्ज काढणे म्हणजे व्याज देणे, पैसे गमावणे. त्यापेक्षा आपण आपत्कालीन निधी तयार केला तर त्यावर व्याज मिळेल आणि संकट आले तर कर्ज काढण्याची गरज नसेल.

विमा असेल तर कदाचित आपत्कालीन निधी वापरण्याचे सुद्धा काम पडणार नाही. समजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले आणि कॅशलेस आरोग्य विमा असेल तर आपत्कालीन निधी तोडण्याची गरज नाही.

इतर लेख वाचण्याकरिता इथे क्लिक करा.

मला आवडलेल्या पुस्तकांचा सारांश वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या.

आमच्या Youtube चॅनेल ला इथे भेट द्या.

Leave a Comment

म्युच्युअल फंड वितरकाशी बोला

पुढील लेख चुकवायचे नाहीत ? मग नोंद करा.